पुण्यात एसटी स्थानकांमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट (फोटो- istockphoto)
पुणे: एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. दिवाळीत प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्वारगेट एसटी स्थानकात ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरुन नेली, तसेच छत्रपती संभाजीनगर परिसरातून पुण्याकडे येणाऱ्या एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ८८ हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील रहिवासी आहेत. ते गुरुवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी पावणेसहाच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकातील फलाट क्रमांक नऊ परिसरात थांबले होते. एसटी बसमध्ये प्रवेश करताना ज्येष्ठाच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली. सोनसाखळी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक आल्हाटे तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर परिसरातून पुण्याकडे येणाऱ्या एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज परिसरात राहायला आहेत. त्या दिवाळीनिमित्त नातेवाईकांकडे आल्या होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या पिशवीतून मंगळसूत्र, रोकड, मोबाइल संच असा ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेण्यात आला. पोलीस हवालदार बोरकर तपास करत आहेत.
हेही वाचा: Crime News: पुण्यात निवृत्त लष्करी जवानाकडून गोळीबार; कारण जाणून व्हाल थक्क
दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर परिसरातील एसटी स्थानकाच्या आवारातून प्रवासी महिलेच्या पिशवीतून साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिवाळीत एसटी स्थानकाच्या आवारात प्रवाशांकडील ऐवज चोरून नेण्याच्या घटना वाढतात.
दिवाळीत एसटी स्थानकांच्या परिसरात गर्दी असते. शहरात वास्तव्यास असणारे विद्यार्थी, नोकरदार गावी जातात. दिवाळीत एसटी स्थानकाच्या आवारात ऐवज चोरीला जाण्याच्या घटना वाढीस लागतात. एसटी स्थानकाच्या आवारात पोलिसांचा वावर नसतो. एसटी स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याच्या तक्रार करण्यात आली आहे.
Crime News: पुण्यात निवृत्त लष्करी जवानाकडून गोळीबार; कारण जाणून व्हाल थक्क
ऐन दिवाळीत शहरात गोळीबाराची घटना घडली. येरवड्यात पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने एका टेम्पोचालकावर बंदुकीतून गोळीबार केला. गोळीबारात टेम्पोचालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी रात्री उशिरा येरवड्यातील अशोकनगर परिसरात ही घडली घडली. शहानवाज शेख असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त लष्करी जवान श्रीकांत पाटील याला येरवडा पोलिसांनी अटक केली. येरवडा भागातील अशोकनगर परिसरात पाटील आणि शहानवाज यांच्यात गुरुवारी रात्री उशिरा पार्किंगच्या कारणावरून वाद झाला. रागातून पाटील याने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेख गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णलायात उपचार सुरू असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली.