संग्रहित फोटो
शिरोली : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांनाही यश मिळत नाही. गुन्हेगारांमधुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुलाची शिरोलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी झालेल्या वादात पुलाची शिरोलीतील पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी दोघांवर सत्तूरने वार केल्याची घटना घडली आहे.
जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. संतोष राजेश रणदिवे (वय ३५), गौतम हरिश्चंद्र चौगुले (वय ३५, दोघेही रा. इंगळीकर कॉलनी, माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले), मंगल रविंद्र कांबळे (वय ४२), आरती आदेश कांबळे २० व आदेश रविंद्र कांबळे (वय २५, रा. माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना सावंत कॉलनी येथे घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या मिळालेली माहितीनुसार, पुलाची शिरोलीतील सावंत काॅलनी येथे आदर्श मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू होती. मिरवणूकीत आदेश कांबळे हा ट्रॅक्टरच्या बाॅनेटवर उभा राहून नाचत होता. त्याला खाली उतर असे सांगत संतोष रणदिवे याने पायावर काठी मारली. त्याला प्रतिउत्तर देत आदेश यानेही रणदिवेला खाली उतरून काठीने मारहाण केली. रणदिवे व चौगुले हे दोघे रात्री बाराच्या सुमारास मिरवणुकीतील या वादाचा जाब विचारण्यासाठी आदेशच्या घरी गेले होते. यावेळी घरासमोर त्यांच्यांत जोरात वाद झाला. यावेळी आदेशाची आई व पत्नी यांनाही मारहाण करण्यात आली.
तर आदेशने रणदिवे व चौगुले यांच्या डोक्यात सत्तुरणे वार केले, यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. रणदिवे याच्या डोक्यावर दहा आणि चौगुले याच्या डोक्यावर अकरा टाके पडले आहेत. सर्वांवर कोल्हापुर येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सीपीआर चौकीत याची नोंद होऊन रात्री उशिरा याबाबतचा गुन्हा शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. या घटनेमुळे सावंत काॅलनीत तणावाचे वातावरण होते.
गाडी न दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला
कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराने गाडी न दिल्याच्या रागातून लोखंडी पाईप एकाच्या डोक्यात मारला आहे. पाईप डोक्यात मारल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. निखिल नितीन घाडगे (वय 25 रा. साईनाथनगर भोनेमाळ) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी आशादुल्ला हारुण जमादार (वय 27 रा. अशोक सायझिंगमागे) याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जमादार याला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असतानाही तो शहरात वावरत होता. ही घटना विसर्जन मिरवणूकीदरम्यान रात्री 9 वाजता घडली आहे.