सौजन्य - सोशल मिडीया
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे म्हात्रे पुल रोडवर अनंत रेस्टाँरट अँड बार आहे. पांडळे पॅलेसकडून म्हात्रे पुलाकडे जात असताना हे हॉटेल आहे. चौघे रात्री एकच्या सुमारास हॉटेलात आले, त्यांनी बिअरच्या किंमतीची विचारपूस केली आणि परत गेले. नंतर तक्रारदारांनी वेळ झाल्याने दीडच्या पुर्वीच हॉटेलचे शटर खाली घेतले आणि आतमध्ये क्लिनींग सुरू केले. तेव्हा एक टेबलावर काही ग्राहक जेवण करत होते. दरम्यान, चौघे पुन्हा हातात कोयते घेऊन आले. त्यांनी शटर उघडले आणि आत शिरले. तोंडाला मास्क आणि चेहऱ्यावर टोपी घालून आलेल्या चौघांनी थेट आत बसलेल्या ग्राहकांना तसेच मालकाला कोयत्याचा धाक दाखविला. त्यांना धमकावत गल्यात असलेली रोकड घेतली.
जमलेली जवळपास १५ ते २० हजारांची रोकड घेतल्यानंतर चौघेही तेथून बाहेर पडले आणि पळून गेले. घटनेनंतर घाबरलेल्या चालकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याघटनेचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांकडून चौघांचा शोध सुरू करण्यात आला आहे. रात्रीपर्यंत त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळू शकली नव्हती. अधिक तपास डेक्कन पोलिस करत आहेत.






