संग्रहित फोटो
शिक्रापूर : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राजकीय नेत्यांच्या घरांनाही चोरटे टार्गेट करत असल्याचं दिसून येत आहे. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे व कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनंता पांडुरंग गायकवाड (वय ४२ वर्षे रा. वाजेवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे व कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांचा बंगला असून, सदर ठिकाणी काही कामगार असतात, १५ मे रोजी दुपारच्या सुमारास बंगल्यातील कामगार आले असता त्यांना बंगल्याच्या दरवाजाच्या कड्या तुटलेल्या दिसल्याने त्यांनी पाहणी केली असता, अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या कंपाउंडच्या तारा तोडून पाठीमागील दरवाजा उघडून आतमध्ये येऊन सर्व वस्तू अस्थाव्यस्त टाकून देऊन चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे.
जबरदस्तीने महिलेची सोनसाखळी हिसकावली
बिबवेवाडी-स्वारगेट रस्त्याने पायी चालणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातून चोरट्यांनी जबरदस्तीने सोनसाखळी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला असून, घटनेत महिला थोडक्यात बचावली आहे. चोरट्यांनी हिसका दिल्यानंतर महिला खाली कोसळली. त्यातून ती बचावली आहे. ९९ हजार रुपयांची सोनसाखळी चोरून चोरटे पळून गेले. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात ५५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दुचाकीवरील दोन चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.