संग्रहित फोटो
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातील कोंढव्यातून एक चोरीची बातमी आली आहे. कोंढवा भागातील आश्रफनगर येथील चोरट्यांनी भरदिवसा फ्लॅट फोडून तीन लाख १४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आशरफी मस्जिद बिल्डिंग परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. ही घटना २२ मे रोजी सकाळी पावणेअकरा ते दुपारी साडेतीन या दरम्यान घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला घरी नव्हत्या. तेव्हा चोरट्याने बनावट चावीच्या मदतीने त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप उघडले. घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटातील सेफ्टी लॉकरमधून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तीन लाख १४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सहायक निरीक्षक सुकेशिनी जाधव याचा तपास करीत आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
पुण्यात घरफोड्यांचे सत्र कायम
पुणे शहरात पुन्हा चोरट्यांनी आपला धुमाकूळ सुरूच ठेवला असून, विश्रामबाग, बंडगार्डन व सिंहगड रोड परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या घरफोडीच्या घटनांमध्ये सुमारे १९ लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केला आहे. सर्व प्रकरणांत मात्र दरवेळी सारखेच याहीवेळी आरोपी अज्ञात आहेत. पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनांमुळे भागातील रहिवशांमध्ये भितीचे वातावरण आहे.
सिंहगड रोडवरील घरात घुसून साडेसात लाखांची चोरी
सिंहगड रोडवरील आनंदनगर भागात देखील घरफोडी झाली आहे. वपीन अजयराव घाडगे (वय ४५) यांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या आशिष अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये घुसून घरफोडी केली आहे. १७ ते २० मे दरम्यान दरवाजाचा कडी-कोयंडा कापून प्रवेश करण्यात आला. चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाट फोडून सुमारे ७,३९,२०० रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.