संग्रहित फोटो
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असूनदररोज राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मावळ तालुक्यातील तिकोना पेठ येथे असलेल्या अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या बंद बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहमद मुजीफ खान (वय ५४, रा . जयसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहमद खान हे माजी क्रिकेटपटू मोहमद अजहरउद्दीन यांचे स्वीय सहायक आहेत. संगीता मोहमद अजहरउद्दीन-बिजलानी यांच्या मालकीचा मावळ तालुक्यातील तिकोना पेठ येथे बंगला आहे.
५७ हजरांचा मुद्देमाल लांबविला
बंगल्याच्या मागील बाजूस कुंपण आहे. कुंपणाला लावलेली जाळी तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. चोरटे बंगल्यातील पहिल्या मजल्यावर शिरले. खिडकीची जाळी उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून ५० हजारांची रोकड आणि सात हजार रुपये किंमतीचा दूरचित्रवाणी संच असा एकुण मिळून ५७ हजारांचा मुद्देमाल लांबविला, असे खान यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा : ‘प्लास्टिकला पर्याय’ म्हणत थाटात उद्घाटन; प्रत्यक्षात यंत्र बिघडलेले अन् दुर्लक्षित
पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरु
बंगल्यात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खान यांनी शनिवारी (१९ जुलै) फिर्याद दिली. पोलीस हवालदार एस. एस. बोकड तपास करत आहेत. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले.
वाईत भरदिवसा चोरट्यांनी दोन घरे फाेडली
वाई तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाईच्या गंगापुरीतील सृष्टी अपार्टमेंटमधील बंद सदनिका हेरून सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान चोरट्यांनी कुलुप तोडले, आत प्रवेश करुन कपाटातील सोने आणखी दिड लाख रुपये रोख घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तेथीलच आणखी एका फ्लॅटचे कुलूप तोडून तेथील कपाटात ठेवलेले १० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. दिवसाढवळ्या वाई शहरात झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.