सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे/वैष्णवी सुळके : पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात बसवलेले ‘कापडी पिशवी वेंन्डिंग मशीन’ नागरिकांच्या फायद्याऐवजी सध्या त्रासाचे कारण ठरले आहे. पर्यावरणपूरक उपक्रम म्हणत उद्घाटनाचा गाजावाजा झाला, पण प्रत्यक्षात यंत्र बंद, बिघडलेले आणि दुर्लक्षित आहे. या संदर्भात प्रशासन, संस्था आणि यंत्रणा एकमेकांवर जबाबदारी ढकलताना दिसत आहेत.
या उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पर्यावरण दिनानिमित्त करण्यात आले. त्यांनी यावेळी म्हटले होते की, “गणपतीपासून जे काही सुरू होतं, ते निर्विघ्न पार पडतं,” अशी श्रद्धा ठेवून या पर्यावरणपूरक यंत्राचा शुभारंभ इथून केला जात आहे. ‘प्लास्टिकला पर्याय’ या घोषणेसह उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. मात्र दुसऱ्याच दिवशी हे यंत्र बंद पडल्याने श्रद्धा, नियोजन आणि व्यवस्थापन यांची तिहेरी परीक्षा लागली आहे.
याबाबत चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की, दुसर्या दिवशीच हे यंत्र बिघडल्याचे समजले. त्यानंतर हे सुरू केल्यानंतरही काही तासांमध्ये यामध्ये बिघाड झाला. जवळपास तीन ते चार वेळा यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. मात्र, त्यानंतर त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. सद्यस्थितीत ही मशीन पूर्णपणे बंद स्थितीत असून बर्याच दिवसांपासून याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
हे मशीन पैसे टाकल्यावर कापडी पिशवी देईल, अशी योजना आहे. यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला जात आहे. मात्र, ही मशीन काम करत नसल्यामुळे अनेक भाविकांचे पैसे वाया जात आहेत. मशीनमध्ये पैसे टाकल्यानंतर यातून पिशवी येत नाही. याबाबत मशीनवर कोणतीही सूचना नाही, बिघाडाची माहिती दिलेली नाही. तसेच पिशव्यांचे यंत्र बसवल्यापासून त्यातून नेमकी किती पिशव्यांची विक्री झाली, याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच बंद झाल्यानंतर किती तक्रारी आल्या, किती नुकसान झाले, याबाबतची कोणतीही आकडेवारी नाही.
प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, अर्थात महाराष्ट्रातील विशेष अशा दगडूशेठ मंदिरात हे यंत्र बसवले, ही अतिशय उत्तम कल्पना आहे. मात्र, त्यामध्ये वारंवार बिघाड झाल्यानंतरही याची दखल न घेता जबाबदारी एकमेकांवर ढकलणे सुरू असल्याचे चित्र आहे.
जबाबदारी कुणाची? कोणतीच स्पष्टता नाही
या यंत्राचे व्यवस्थापन प्रशासनाकडे आहे की, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टकडे आहे, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. याबाबत काहींशी संपर्क साधला असता, प्रशासकीय अधिकारी म्हणतात, हे आमच्या अखत्यारित नाही. तर मंदिर ट्रस्टकडून उत्तर येते की, आम्ही केवळ ठिकाण उपलब्ध करून दिले असून काही बिघाड झाल्यास ते कळवण्याचे काम आम्ही करतो. मात्र, याबाबतचे सर्व अधिकार प्रशासनाकडे आहेत.
हे यंत्र बसवल्याच्या दुसर्याच दिवशी त्यात बिघाड झाला. त्यानंतर त्यात दुरुस्ती केल्यावरही काही तासांमध्येच ते पुन्हा बंद पडते. याबाबत भाविक व नागरिकांना कोणतीही कल्पना नसल्याने ते त्यात पैसे टाकतात आणि त्यातून पिशवीच बाहेर येत नाही.
– दगडूशेठ येथील फूलविक्रेते
या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, पैसे टाकल्यानंतर पिशवी न मिळण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकही हल्ली त्या यंत्राकडे पाठ फिरवत आहेत. त्याबाबत ते आम्हाला विचारणा करतात.
– दगडूशेठ येथील फूलविक्रेते