संग्रहित फोटो
टेंभुर्णी : टेंभुर्णी येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दोन दिवसांत ५ दुकाने फोडली आहेत. ३ लाखांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली आहे. सोमवारी (दि. २) सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या चोरीच्या घटनेने व्यापारी वर्ग हादरला आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी व्यापारी वर्गांतून होत आहे.
चोरट्यानी शहरातील महामार्गावरील बारवे मळा येथील विजयकुमार कोठारी यांच्या शीतल गारमेंट या शोरूममध्ये तळ मजल्यावरील मागील खिडकी तोडून आत प्रवेश केला. मुख्य कॅबिनचा ड्राव्हर तोडून त्यातील २ लाख, ८८ हजार रुपये रोख रक्कम, १२ हजार ५०० रुपये किमतीचे दोन पीईओ स्विच व दोन बॅगा चोरून नेल्या. तसेच खिडकी व सामानाचे नुकसान केले. रात्री दिडच्या सुमारास अज्ञात दोन बुरखाधारी चोरट्यांनी ही चोरी केली.
रविवारी (दि. १) रात्री दानेच्या सुमारास शहरातील करमाळा रोडवरील गोविंद भास्कर जगताप यांच्या विठ्ठल कृषी सेवा केंद्र या दुकानात छतावरील पत्रा कापून प्रवेश केला. दुकानातील सहा हजार रुपयांची हार्ड डिस्क, राउटर व इतर वस्तू घेऊन गेले. त्यानंतर त्याच रात्री बारवे मळा येथील पाटील शॉपिंग सेंटरमधील रवि कादे यांचे श्रीराम अग्रो, खडके यांचे ब्रह्मचैतन्य गिफ्ट हाऊस, गणेश कदम यांचे मातोश्री गारमेंट ही शेजारची तीन सलग दुकाने फोडली. छतावरील पत्रा कापून दुकानात शिरून आतील डीव्हीआर व किरकोळ रक्कम चोरून नेली. शहर परिसरात ही चोरीच्या घटना वाढल्या आहेत. वाढत्या चोरीच्या घटनेने व्यापारी वर्ग हादरला आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी व्यापारी वर्गांतून होत आहे.