संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. खून, हाणामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना दररोज उघडकीस येत असतात. गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. गुन्हेगारीला पोलिसांनी आळा घालावा अशीही मागणी केली जात आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमली पदार्थ खरेदीसाठी आलेल्या तीन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना रास्ता पेठेतील क्वार्टर गेट चौक परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडली आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश उणेचा, चैतन्य, तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात राहुल बंडू पवार (वय ३१, सध्या रा. काळेपडळ. मूळ रा. रांजणी, ता. गेवराई, जि. बीड ), गौरव नितीन साठे, राजा मुन्ना पंडीत जखमी झाले आहेत. पवार यांनी याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शिवीगाळ करुन तीक्ष्ण शस्त्राने वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार, साठे, पंडीत हे मंगळवारी (२ सप्टेंबर) मध्यरात्री दोनच्या सुमारास आरोपी उणेचा आणि साथीदारांकडून मेफेड्रोन खरेदी करण्यासाठी आले होते. रास्ता पेठेतील सिटी चर्चसमोर आरोपींनी त्यांना भेटायला बोलाविले होते. आरोपींनी पवार याच्याकडून पैसे घेतले. पैसे घेतल्यानंतर त्याला मेफेड्रोन दिले नाही. यावरुन त्यांच्यात वाद-विवाद झाला. त्यानंतर आरोपींनी पवार, साठे, पंडीत यांना शिवीगाळ करुन त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेची माहिती मिळताच सहायक आयुक्त अनुजा देशमाने, समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करत आहेत.
पुण्याच्या मध्यभागातही घटना
दरम्यान, एकीकडे शहरात पोलिस ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाई करत असताना थेट मेफेड्रोनच्या खरेदीवरून खूनी हल्ला झाल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्याच्या मध्यभागातही घटना घडली आहे. पोलिसांकडून सातत्याने विक्रेत्यांवर कारवाई होत असताना मध्यभाग दुर्लक्षित राहत असल्याचे दिसत आहे.