संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, फुरसूंगीत चोरट्यांनी स्क्रॅपचे गोडावून फोडून तब्बल ४० लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. त्यासोबतच दोन दिवसात शहरात घरफोडीच्या ५ घटना घडल्या आहेत. बिबवेवाडी, वानवडी तसेच काळेपडळ, विश्रामबाग, कोथरूड या पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील घरफोडीचे गुन्हे घडले आहेत.
याप्रकरणी फुरसूंगी पोलिसांत ५१ वर्षीय व्यवसायिकाने तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार व्यवसायिक असून, त्यांचे प्रणाम इंटरप्रायझेसचे गोडाऊन ऊरळी देवाची येथे आहे. दरम्यान, गोडावून बंद असताना चोरट्यांनी भिंतीच्या साईडला असलेला पत्रा उचकटून आत प्रवेश केला. तसेच, गोडाऊनमधील इलेक्ट्रीकलचे ४० लाखांचे स्क्रॅप चोरून पोबारा केला. हा प्रकार मध्यरात्री घडला आहे. अधिक तपास फुरसूंगी पोलीस करत आहेत.
तसेच, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकमान्य नगर येथे चोरट्यांनी लोखंडी ग्रीलच्या दरवाजाचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. तसेच, ७ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तसेच, कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी कर्वे रोडवरील गोसावी वस्तीत टायर विक्रीचे दुकान फोडले आहे. येथून चोरट्यांनी ४४ हजार ९५० रुपयांचे नवीन टायर चोरून नेले आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय दुकान मालकाने तक्रार दिली आहे. तर, काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घराचे कुलूप उचकटून तिजोरीत ठेवलेले रोख ३० हजार रुपये चोरून नेले आहेत. याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने पोलिसांत तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
सोमवारी उघडकीस आलेल्या घटनांमध्ये चोरट्यांनी बिबवेवाडी आणि वानवडी येथील दोन बंद फ्लॅट फोडून साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत एका ३९ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कुटुंबीयांसोबत बाहेर गेले होते. त्यांचे घर दोन दिवस बंद होते. याकाळात त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने असा ८ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. दुसरी घटना वानवडीत घडली असून, शिंदेवस्ती येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणाचे कुटूंबिय शुक्रवारी आणि शनिवारी खासगी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घराच्या दरावाजाचे कुलूप तोडून सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली.
पीएमपी प्रवासात चोरीच्या तीन घटना
पीएमपी बसमध्ये प्रवासी महिला तसेच व्यक्तींकडील दागिने व रोकडवर चोरट्यांकडून डल्ला मारला जात आहे. चोरीच्या तीन घटना घडल्या असून, यात ५ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. विमानतळ परिसरात ३० वर्षीय व्यक्ती जनकबाबा दर्गा ते खराडी बायपास पीएमपीने प्रवास करत होता. त्याने बॅगेत साडे तीन लाखांची रोकड ठेवली होती. प्रवासीतील गर्दीत चोरट्यांनी बॅगेची चैन उघडून ही रोकड चोरून नेली. याप्रकरणी सोमवारी विमानतळ पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. तसेच, शनिवारी सायंकाळी स्वारगेट ते कात्रज बस प्रवासादरम्यान ४२ वर्षीय महिलेचे ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञाताने हिसकावून नेले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. तर, स्वारगेट ते औंध गाव या मार्गावरील पीएमपी बसमध्ये ५८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मंगळसूत्र असे १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हातचलाखीने चोरून नेला. याप्रकरणी चत:शृंगी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.