संग्रहित फोटो
ठाणे : उल्हासनगरमधून एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. बालसुधारगृहातून ६ अल्पवयीन मुली पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सहा पैकी तीन मुलींचा शोध पोलिसांनी घेतला आहे. तर तीन मुलींचा शोध पोलीस घेत आहेत. मुली पळून गेल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या मुली पळून गेल्याने बालसुधारगृहाच्या सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावरुन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासकीय मुलींचे निरीक्षणगृह/विशेषगृह, उल्हासनगर–५ येथून सहा मुली बेपत्ता झाल्याच्या गंभीर घटनेमध्ये तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी म्हणाल्या की, दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी घडलेल्या या घटनेत तीन मुलींचा शोध लागला असला तरी उर्वरित तीन मुली बेपत्ता आहेत. यापूर्वीदेखील अशा घटना घडल्यामुळे राज्यातील बालगृहांमध्ये मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तत्काळ उपाययोजनांमध्ये सतर्क महिला पोलिसांची गस्त वाढविणे, परिसरातील दलाल व फूस लावणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच जिल्हा प्रशासन आणि संबंधित संस्थेच्या प्रमुखांसह समन्वय साधून शासन स्तरावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी निलम गोऱ्हे यांनी केली आहे.
या निवेदनाची प्रत महिला व बालविकास मंत्री, गृह विभागाचे सचिव, महिला व बालविकास विभागाचे सचिव आणि आयुक्त यांना पाठविण्यात आली असून, डॉ. गोऱ्हे यांनी या गंभीर समस्येवर वैयक्तिक लक्ष घालून ती मुळापासून सोडविण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
मुली अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ
बुधवारी दुपारी दोन ते तीन वाजताच्या दरम्यान उल्हासनगर येथील शासकीय बालसुधार गृहातून सहा अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्या. त्यानंतर माहिती समोर आली की, या मुलींनी मेन गेटची चावी कुठून तरी मिळवली. मेन गेट उघडून सहा मुलींनी तिथून पलायन केले. या प्रकरणात उल्हासनगर हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी सहा मुली अचानक बेपत्ता झाल्याने याचा तपास सुरु केला. उल्हासनगरचे डीपीसी सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलींना शोधण्यासाठी पथके नेमली गेली. तीन मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती समोर आली आहे.