संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरातील घरफोड्यांचे सत्र कायम असून, नऱ्हे व लोहगावमध्ये चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून अडीच लाखांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. दोन्ही घटनांमधील चोरट्यांचा थांगपत्ता मात्र पोलिसांना लागलेला नाही. शहरात गेल्या काही वर्षांपासून घटफोड्यांचे प्रकार वाढले असल्याचे दिसत असताना पोलिसांना याला आवर घालण्यात अपयश येत आहे.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात निखील बिराजदार (वय २३, रा. साईनाथनगर, नर्हे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार निखील नऱ्हे परिसरात साईनाथ नगर येथे राहण्यास आहे. निखील घराला कुलूप लावून कामावर गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी हॉलमधील बॅगेतून ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला.
दुसरी घटना लोहगाव परिसरात घडली असून, चप्पल स्टँडमध्ये ठेवलेली चावी घेऊन घर उघडत घरातील कपाटातून सोन्या-चांदिचे दागिने असा एकूण १ लाख ७९ हजार २४० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. याबाबत ४० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून विमानतळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.