संग्रहित फोटो
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, सिंहगड रस्त्यावरील फनटाईम थेटरच्या पाठिमागील भाजी बाजारातूनच भरगर्दीत एका व्यक्तीच्या हातातील ८० हजार रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट चोरट्यांनी चोरून पोबारा केल्याचा प्रकार घडला आहे. भाजी आणण्यासाठी संबंधीत व्यक्ती आल्यानंतर रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. दरम्यान, याठिकाणी भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी असते. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी देखील प्रचंड होते. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत ५० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार वडगाव बुद्रुक परिसरात राहतात. ते नेहमी या भागात भाजी खरेदीसाठी येतात. थेटर मागील पुलावर भाजी बाजार भरतो. येथे मोठी गर्दीही होते. तक्रारदार सोमवारी रात्री आठच्या सुमारास आले होते. ते भाजी घेत असताना गर्दीतून त्यांच्या हातातील ८० हजार रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट चोरट्यांनी चोरून नेले. काही वेळानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. नंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पाटण तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट
विहे (ता. पाटण) येथे शनिवारी रात्री वारीला गेलेल्या दांपत्याचे घर फोडून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील साडेआठ तोळे सोने व २० हजार रुपये रोख रक्कम घेऊन ४ चोरटे पसार झाले आहेत. गावातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे निदर्शनास आले. त्यादृष्टीने मल्हारपेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वडगावमध्ये भरदिवसा घरफोडी
गेल्या काही दिवसाखाली वडगाव बुद्रुक परिसरात चोरट्यांनी भरदिवसा बंद फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दीपाली प्रसाद गुरव (वय ३४, रा. सद्गुरुकृपा बिल्डींग, रेणुकानगरी, वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनुसार, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.