संग्रहित फोटो
पुणे : कोथरूड तसेच पाषाण परिसरात मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलेल्या ज्येष्ठ नागरिकासह महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना रविवारी घडली आहे. याप्रकरणी कोथरूड, अलंकार आणि चतु:शृंगी पोलिसांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून पोलिसांकडून या आरोपींचा माग काढण्यात येत आहे.
याप्रकरणी ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार पंचवटी (पाषाण) सोसायटी परिसरात रविवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास ‘वॉकिंग’ करत होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला पायी चालताना मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ येऊन पत्ता विचारण्याच्या बहाणा केला. त्यांना थांबवले व पत्ता विचारण्यास सुरूवात केली. परंतु, तेव्हाच मागे बसलेल्या तरुणाने अचानक वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली. नंतर दोघे दुचाकीवरून पळून गेले. चोरीस गेलेल्या साखळीची किंमत अंदाजे ८० हजार रुपये होती. चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.
सोनसाखळी चोरीची दुसरी घटना कोथरूडमधील लोहिया जैन आयटी पार्कजवळ घडली आहे. याप्रकरणी ६९ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार या मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. पौड फाट्याकडे जाणारा रस्ता ओलांडून त्या थांबल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ येऊन गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि पसार झाले. सहायक निरीक्षक बालाजी सानप याचा तपास करत आहेत.
तिसरी घटना दशभुजा गणपती मंदिराजवळ रविवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. कोथरूडच्या राऊतवाडीत राहणारी ४३ वर्षीय महिला मुलासोबत सकाळी घराबाहेर पडल्या होत्या. त्यांचा मुलगा देव पुजेसाठी फुले विकत घेत होता. त्यामुळे त्या दशभुजा गणपती मंदिराजवळ थांबल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून चालत आलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावले. नंतर तो साथीदारासह दुचाकीवरून पळून गेले.