पिस्तुलाच्या धाकावर मागितले २० लाख (फोटो सौजन्य: social media)
नागपूर : पिस्तुलाचा धाक दाखवून 20 लाख रुपये लुटून नेल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली. याप्रकरणी सराईत गुंड आशिष कुबडे उर्फ बोमाविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोमाने व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर पिस्तूलाचा धाक दाखवून २० लाख रुपये मागितले. पैसे मिळाले नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली.
इंद्रकुमार घिसूलाल अग्रवाल (वय ५२, रा. सिव्हिल लाईन्स) यांनी तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अग्रवाल यांचा कपडे आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. बोमा शहरातील कुख्यात आणि वादग्रस्त सट्टेबाज आहे. अजय शर्मा नामक मित्राच्या माध्यमातून अग्रवाल यांची ओळख बोमाशी झाली होती. व्यवसायी असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली. १८ जानेवारीला अग्रवाल संत्रा मार्केटच्या मारवाडी चाळ येथील दुकानात बसले होते. यादरम्यान बोमा दुकानात आला आणि एका प्रॉपर्टीचे कागदपत्र दाखवून १.२० कोटी रुपयांची मदत मागितली.
दरम्यान, पुढच्याच महिन्यात अग्रवाल यांच्या मुलाचे लग्न असल्याने त्यांनी पैसे देण्यात असमर्थता दर्शविली. यामुळे बोमा त्यांना शिवीगाळ करत निघून गेला. तेव्हापासून अग्रवाल यांनी त्याच्याशी बोलचाल बंद केली होती. १८ फेब्रुवारीला तो निमंत्रण नसतानाही अग्रवाल यांच्या मुलाच्या लग्नात गेला होता.
फोन करून खाली बोलावले
गेल्या ३ डिसेंबरच्या मध्यरात्री पावणेचारच्या सुमारास बोमाने त्यांना फोन करून अपार्टमेंटखाली भेटायला बोलावले. ५ मिनिटांनंतर बोमाने पुन्हा फोन करून आवश्यक काम असल्याचे सांगून खाली बोलावले. खाली येताच बोमाने अग्रवालची कॉलर पकडत शिवीगाळ सुरू केली. पैसे न दिल्याच्या कारणातून त्याने वाद घातला. व्यवसाय करायचा असेल तर २० लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणून धमकावले आणि पिस्तूल काढली. पैसे मिळाले नाहीतर गोळी मारण्याची धमकी दिली. यामुळे अग्रवाल यांनी पैशांची व्यवस्था करण्याचे आश्वासन देत स्वतःची सुटका करून घेतली.
घरासह दुकानात धडक
७ डिसेंबरच्या रात्री २ वाजताच्या सुमारास बोमाने पुन्हा त्यांना कॉल करून शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी देऊन सकाळी सहापर्यंत २० लाख रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितले, अन्यथा गोळी मारण्याची धमकी दिली. त्रस्त होऊन अग्रवाल यांनी सदर पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून बोमाचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी त्याचे घर आणि बेसा मार्गावरील सराफा दुकानात धडक देऊन काही कागदपत्रही जप्त केले.
हेदेखील वाचा : Jalgaon Crime: विद्यार्थिनींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधण्यास भाग पाडले; शाळेच्या मुख्याध्यापक आणि आठ शिक्षकांवर गुन्हा दाखल






