संग्रहित फोटो
पुणे : कामाचे पैसे मागितल्याने झालेल्या वादातून दोघांवर कोयत्याने वार करून त्यांच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना लोहगाव भागात घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. रोहित प्रकाश पारख (वय २९, रा. वडगाव शेरी), अक्षय पाटोळे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी कल्पेश फकीरचंद रंगारी (वय ४२, रा. फाॅरेस्ट पार्क सोसायटी, लोहगाव) याला अटक केली आहे. याबाबत रोहित पारख यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पारख आणि त्याचा मित्र पाटोळेने रंगारी यांचे काम केले होते. कामाचे पैसे मागितल्याने रंगारी आणि पारख यांच्यात वाद झाला. पारख आणि पाटोळे रंगारी याच्याकडे कामाचे पैसे मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी रंगारीने पारख यांना शिवीगाळ केली. रंगारीने घरातून कोयता आणला. त्याने पारख यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यावेळी पाटोळेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी पाटोळे यांच्यावरही कोयत्याने वार केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तपास करत आहेत.
दोन तरुणांवर कोयत्याने वार
गेल्या काही दिवसाखाली भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पसार झालेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.