सौजन्य - नवराष्ट्र टीम
शिक्रापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिक्रापूर ते न्हावरे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. मालवाहू कंटेनरची एका कारला समोरासमोर जोरदार धडक लागून झालेल्या भीषण अपघातामध्ये न्हावरेतील बाप लेकींसह लेकीच्या मामाचा जागीचं मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे.
शिक्रापूर ते न्हावरे राष्ट्रीय महामार्गावरून कैलास गायकवाड हे त्यांच्या ताब्यातील एम एच १६ सि व्ही ४१७६ या स्विफ्ट कार मधून त्यांच्या पत्नी, मुलगी व मेव्हणे यांना घेऊन शिक्रापूर बाजूने न्हावरे दिशेने जात असताना न्हावरे बाजूने भरधाव वेगाने आलेल्या एन एल ०५ जि २३९६ या कंटेनरवरील चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर समोरून आलेल्या स्विफ्ट कारला धडकून अपघात झाला. दरम्यान अपघात होताच कंटेनर चालक पळून गेला आहे.
या अपघातात कैलास उर्फ दादा कृष्णाजी गायकवाड (वय ५० वर्षे), गौरी कैलास गायकवाड (वय १८ वर्षे दोघे रा. निवाळकर वस्ती न्हावरे ता. शिरुर जि. पुणे), गणेश महादेव नेर्लेकर (वय २३ वर्षे रा. कोकणगाव ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुर्गा कैलास गायकवाड (वय ४५ वर्षे रा. निवाळकर वस्ती न्हावरे ता. शिरुर जि. पुणे) या गंभीर जखमी झाल्या, तर सदर अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत रवींद्र महादेव सोनवणे (वय ३८ वर्षे, रा. कुटेवस्ती न्हावरे ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी कंटेनरवरील चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी भोते हे करत आहेत.