संग्रहित फोटो
पुणे : कात्रज परिसरातील जांभुळवाडी रस्त्यावर भरधाव दुचाकीवरील नियत्रंण सुटून दुचाकी विद्युत खांबावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाचा मृत्यू झाला आहे. अपघातात दुचाकी चालक दत्ता कल्याण चोरमले (रा. आंबेगाव) व पाठिमागे बसलेला सहप्रवासी श्रीकांत गुरव अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई प्रकाश शिंदे यांनी आंबेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चोरमले मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास मित्र श्रीकांत यांच्यासोबत जांभुळवाडी रस्त्याने जात होते. गाथा स्विमिंग पूलजवळ आल्यानंतर भरधाव दुचाकीवरील नियत्रंण सुटले आणि दुचाकी कडेला असलेल्या लोखंडी विद्युत खांबावर आदळली. दुचाकीचा स्पीड जास्त असल्याने दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला. उपनिरीक्षक सुरेश शिंदे अधिक तपास करत आहेत.
दोन दिवसांपुर्वीच अपघात
दोन दिवसांपुर्वीच कात्रज डेअरीसमोर सोमवारी दुपारी रूग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गेल्या दोन दिवसात कात्रज परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. अशोक तुकाराम शिंदे (वय २६, रा. साळोबा वस्ती, यवत, ता. दौंड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दुचाकीस्वार अशोक यांचे वडील तुकाराम सखाराम शिंदे (वय ४९) यांनी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दिली आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तुकाराम आणि त्यांची पत्नी जखमी झाले. दुचाकीस्वार अशोक, त्यांचे वडील तुकाराम आणि आई पुणे-सोलापूर रस्त्यावरून निघाले होते. २१ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास लोणी काळभोर परिसरातील राजलक्ष्मी लॉनसमोर भरधाव वाहनाने दुचाकीस्वार अशोक यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. अपघातात अशोक यांचा मृत्यू झाला. त्यांचे वडील तुकाराम आणि आई जखमी झाले. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करत आहेत.
भरधाव दुचाकीच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू
गेल्या काही दिवसाखाली भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हडपसर भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वारावर काळेपडळ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सुधाकर दादाराव झांबरे (वय ८०, रा. हांडेवाडी रस्ता, हडपसर) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार रमेश सदाशिव वाडकर (रा. हांडेवाडी रस्ता हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत झांबरे यांच्या पत्नी शांता झांबरे (वय ७०) यांनी तक्रार दिली आहे.