धारदार शस्त्राने तरुणाचा खून
देऊळगाव राजा : शहरातील जालना मार्गावरील ढाब्याजवळ एका 30 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. यातील आरोपींनी संगनमत करून तरुणाचा खून केल्याचे समोर आले आहे. सागर दिगंबर डुकरे (वय 30, रा. किन्ही ताठे, ता. जाफराबाद, जि. जालना) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून रविवारी (दि.1) सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मृत सागर डुकरे याचे बंधू गजानन दिगंबर डुकरे (वय 41, रा. किन्ही ताठे, ता. जाफराबाद, जिल्हा जालना) यांनी देऊळगाव राजा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यानुसार, 30 ते 31 मेच्या मध्यरात्री सागरचे मित्र अक्षय कुकडे आणि इतर आरोपींनी त्यांच्यातील अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने वार करून जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने सागरवर वार केला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेतील आरोपी अक्षय कुकडे आणि त्याच्या एका साथीदाराला देऊळगाव राजा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी चालू आहे. या घटनेमुळे देऊळगाव राजा तालुका तसेच मराठवाड्यातही खळबळ उडाली आहे.
दरम्यान, यामध्ये गँगवॉर असू शकते, असा कयासही लावला जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच बुलढाणाचे अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणीचे निर्देश दिले. याप्रकरणी अधिक तपास प्रभारी पोलिस निरीक्षक आशिष रोही करत आहे.
हडपसरमध्येही तरुणाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, कॅनोलच्या शेजारी बसून पार्टी करत असताना मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर दोन मित्रांनी एका मित्राला वाहत्या पाण्यात टाकून जीवे ठार मारल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या वर्षी (२०२४) घडलेल्या या घटनेत हडपसर पोलिसांनी आकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास करून खूनाचा प्रकार उघडकीस आणला आहे.