फोटो सौजन्य - Social Media
ठाणे-बेलापूर रोडवरील खेरणे एमआयडीसी परिसरात असलेल्या मैखाना हॉटेलमध्ये विनापरवाना हुक्का पार्लर व दारू विक्री सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाईत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात हुक्का पार्लरवर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर राज्यभरात अशा आस्थापनांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर, ठाणे-बेलापूर मार्गावरील या हॉटेलमध्ये रात्री उशिरा हुक्का व दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर सहाय्यक आयुक्त मयूर भुजबळ यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले.
तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने हॉटेलवर छापा टाकत हुक्का पिण्यासाठी लागणारे साहित्य आणि दारू असा एकूण १८,६०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत प्रतीक धर्मराज जाधव, विवेक संतोष जाधव, योगेशकुमार दशरथ नकरगंटी, समीर रफिक खान, दिलीप राजेंद्र सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना नोटीस देण्यात आली आहे.
या हॉटेलविरोधात यापूर्वीही तुर्भे पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करून नोटीस बजावली होती. परंतु, हॉटेल चालकाने पोलिसांच्या कारवाईची व नोटीसींची फारशी दखल न घेता, नियमांचे सातत्याने उल्लंघन केले. आस्थापना रात्री उशिरा बंद झाल्यानंतर पुन्हा उघडून, विनापरवाना हुक्का व मद्य पुरवठा ग्राहकांना केला जात होता. विशेषतः रात्री दीडनंतर गुपचूपपणे हॉटेल सुरू ठेवून हुक्काचे आयोजन व दारू विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून मुद्देमाल जप्त केला व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेल चालकाचा हा प्रकार फक्त कायद्याचे उल्लंघन नसून, सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणारा असल्याने पोलिसांनी ही कारवाई अधिक तीव्रपणे केली आहे. सदर प्रकरणी पुढील तपास तुर्भे पोलीस करत असून, अशा प्रकारच्या अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.