उलवे पोलिसांचा अजब कारभार! सीसीटीव्हीत चोरी स्पष्ट, तरी गुन्ह्याऐवजी ‘मोबाईल गहाळ’ची नोंद!
गुरुवारी (19 फेब्रुवारी) रात्री साई लता इमारतीतील सुरक्षारक्षक आपल्या कुटुंबासह खोलीत झोपलेला असताना, दोन अज्ञात चोरट्यांनी खोलीत प्रवेश केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे चोरटे अत्यंत शिताफीने सुरक्षारक्षकाचा मोबाईल फोन उचलून पसार होताना स्पष्टपणे दिसत आहेत. सकाळी मोबाईल गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर सीसीटीव्ही तपासणी केली असता चोरीची घटना उघडकीस आली.
पीडित सुरक्षारक्षक सीसीटीव्ही फुटेजसह उलवे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला. मात्र, पोलिसांनी फुटेज पाहण्याचीही तसदी घेतली नाही. उलट, ‘मोबाईल सेक्टर २४ परिसरात कुठेतरी पडून गहाळ झाला असावा’ अशी नोंद करून त्याच्या हातावर ‘मोबाईल गहाळ’ची तक्रार देण्यात आली. चोरीचा स्पष्ट पुरावा असूनही गुन्हा नोंदवला जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ही एकमेव घटना नसून, नवी मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये चोरीच्या घटनांची नोंद ‘मोबाईल गहाळ’ किंवा ‘प्रॉपर्टी लॉस’ या सदराखाली केली जात असल्याचे वारंवार समोर येत आहे. चोरीचा गुन्हा दाखल न करता ‘गहाळ’ म्हणून नोंद केल्यास तपासाची जबाबदारी कमी होते आणि गुन्हेगारीचे आकडेही कमी दाखवता येतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
उलवे परिसरात मोबाईल चोरी, रिक्षा, चारचाकी वाहनांमधील साहित्य चोरी, वाहनांचे सुटे भाग (नट-बोल्ट, बॅटरी इत्यादी) चोरीच्या घटना सातत्याने वाढत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र अनेकदा तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकांना गुन्हा नोंदवण्याऐवजी ‘मिसिंग’ किंवा ‘प्रॉपर्टी लॉस’ म्हणून नोंद करून घरी पाठवले जाते, असा आरोप आहे.
परराज्यातून रोजगारासाठी नवी मुंबईत आलेल्या कामगारांसाठी मोबाईल हा केवळ संवादाचे साधन नसून त्यांच्या कष्टाची कमाई आणि कुटुंबाशी संपर्काचे एकमेव माध्यम असते. अशा परिस्थितीत मोबाईल चोरीला गेल्यावरही पोलिसांकडून गंभीर दखल घेतली जात नसल्यामुळे या कामगारांवर दुहेरी अन्याय होत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शेजारी वेगाने विकसित होणारा उलवे नोड आता गुन्हेगारीच्या घटनांसाठी चर्चेत येऊ लागला आहे. चोरी, वाहनफोड, मोबाईल लंपास, रिक्षा व चारचाकी वाहनांमधून साहित्य चोरी अशा घटना सातत्याने घडत आहेत. मात्र, गुन्हेगारीचे अधिकृत आकडे कमी दाखवण्यासाठी पोलिसांकडून चोरीच्या घटनांना ‘गहाळ’ म्हणून नोंदवले जात आहे का? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.
या संपूर्ण प्रकरणावर पोलीस वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात? सीसीटीव्ही पुरावा असूनही चोरीचा गुन्हा नोंदवला जाणार का? उलवे परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर ठोस कारवाई होणार का? की नागरिकांना अशाच प्रकारे न्यायासाठी दरवाजे ठोठावावे लागणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.






