Photo Credit- Social Media
मुंबई: कल्याणमध्ये डिसेंबर 2024 मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. पण शनिवारी (13 एप्रिल) त्याने तुरूंगातच गळफास घेत आत्महत्या केली. विशाल गवळीच्या आत्महत्येनंतर गवळीचे वकील संजय धनके याने तरूंग प्रशासनावरच गंभीर आरोप केले आहेत. विशाल गवळीने आत्महत्या केली नसावी, त्याला मारले गेले असावे, विशाल गवळीचीही अक्षय शिंदेप्रमाणे हत्या केली गेली, असा आरोप संजय धनके यांनी केला आहे.
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने तळोजा कारागृहात पहाटे सुमारे साडेतीन वाजता आत्महत्या केली. तो त्या वेळी शौचालयात गेला होता आणि तिथे टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेत त्याने आयुष्य संपवलं. या घटनेनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला.
या प्रकरणी पीडित मुलीचे वकील नीरज कुमार बोलताना म्हणाले की, न्यायालयाच्या माध्यमातून विशाल गवळीला कठोर शिक्षा झाली पाहिजे होती. त्याला फाशी होण्यासाठी आमचे खूप प्रयत्न सुरू होते. पण त्याने आत्महत्या केली असली तरी आम्हाला एक प्रकारचा न्याय मिळाला आहे. त्याला फाशी झाली असती तर मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर दहशत राहिली असती. त्याने आत्महत्या केली असली तरी आम्हाला न्याय मिळाला, असे वाटते.
विशाल गवळी हा कल्याणमध्ये सराईत गुंड होता. या प्रकरणापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न, छेडछाड काढणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण असे गुन्हे त्याच्यावर होते. त्याने तीन लग्न केली असून दोन बायकांनी सोडून दिल्यानंतर त्याने तिसरे लग्न केले होते. २३ डिसेंबर २०२४ रोजी कल्याणमधील कोळसेवाडी भागात राहणाऱ्या एका चिमुकल्या मुलीला फसवून त्याच्या घरी नेले आणि त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतरही तो दोन दिवस लपून राहिला, ओळख लपवण्यासाठी त्याने दाढीही काढली. पण अखेर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले होते.