संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात चोरीच्या घटना वाढल्या असून, चोरटे दररोज नागरिकांच्या लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारत आहेत. चोरीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चोरट्यांकडून पोलिसांच्या हाती न लागण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जातात. वानवडीत एका चोरी प्रकरणात देखील चोरट्यांनी महिलांसारखा वेश परिधान करून शक्कल लढवली खरी, पण पोलिसांनी त्यांना पकडलेच.
रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीतील कंपनीतून दोन लाखांच्या तांब्याच्या तारांचा बंडल चोरून नेला होता. सीसीटीव्ही व खबरऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख १९ हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा आणि पट्ट्या जप्त करण्यात आला. अमन अजीम शेख (वय २४), मुसा अबू शेख (वय २४, दोघे रा. रामटेकडी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत वानवडी पोलिसांत गुन्हा नोंद आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सत्यजित आदमाने, गु्न्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयकुमार डोके, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलिस कर्मचारी अमोल पिलाणे यांनी केली आहे.
रामटेकडी परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या हारको ट्रान्सफॉर्मर कंपनीत मध्यरात्री चोरट्यांनी शिरून चोरी केली होती. ओळख लपविण्यासाठी त्यांनी महिलांसारखा वेश परिधान केला होता. एकाने पिवळा गाऊन आणि दुसऱ्याने गुलाबी रंगाची सलवार कमीज असा वेश परिधान केला होता. चोरट्यांनी तोंडाला ओढणी आणि स्कार्फ बांधले होते. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना समोर आली होती. वानवडी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. तपासात महिलांचा वेश परिधान करुन कंपनीत चोरी करणारे चोरटे सराइत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी गोपाळ मदने, अमोल गायकवाड आणि अर्शद सय्यद यांना मिळाली. पोलिसांनी चोरटे अमन शेख आणि मुसा शेख यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तांब्याच्या तारा, पट्ट्या, हार्ड डिस्क असा दोन लाख १९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.