धक्कादायक ! भोंदूबाबाने केला महिलेवर तब्बल १४ वर्षे अत्याचार; ५० लाख रुपयांचीही केली फसवणूक (संग्रहित फोटो)
निफाड : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता भोंदूगिरीचा आधार घेत एका महिलेवर तब्बल 14 वर्षे लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. इतकेच नाहीतर पीडित महिलेची ५० लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचेही समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित गणेश जगताप (रा. धारणगाव खडक, कामाख्या मंदिर, निफाड) हा स्वतःला बाबा व तांत्रिक म्हणवत भोंदूगिरी करत होता. त्यास आपल्या ‘कामासाठी’ एका महिलेची आवश्यकता असल्याने कट रचून महिलेच्या पतीला दारूचे व्यसन लावल्याचा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे. पतीचे व्यसन सोडवण्याच्या नावाखाली त्याने फिर्यादी महिलेची जवळीक मिळवली. संशयिताने एक पुस्तक काढून त्यात फिर्यादी, तिचा पती आणि मुलांची नावे लिहिलेली दाखवली. तो पुस्तक दाखवत म्हणाला, ‘तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीस, तर या पुस्तकातील कोणाचातरी बळी जाईल’.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार; व्हिडिओ, फोटोही काढले, विविध हॉटेलमध्ये बोलवायचा अन्…
या जादूटोण्याच्या भीतीचे वातावरण निर्माण करून संशयिताने २०१० पासून ते आजतागायत अनेक वेळा बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत सांगितले. तसेच या काळात संशयिताने ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
नंतर पोलिसांत केली तक्रार अन्…
फिर्यादी महिलेने अखेर धैर्य एकवटून तक्रार दाखल केली असून, या धक्कादायक प्रकरणाची इंदिरानगर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी करीत असून, संशयिताच्या भूमिकेबाबत अधिक चौकशी सुरू आहे.
डॉक्टर महिलेवर वेळोवेळी अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, डॉक्टर महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. महिला डॉक्टरची आरोपी अमरनाथसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. काही दिवसांतच दोघांमध्ये संपर्क वाढला. त्यातून मैत्रीचे नाते घट्ट होत असताना आरोपीने तिचा गैरफायदा घेतला. शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावून त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचे फोटो-व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.






