धक्कादायक ! डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार; विविध हॉटेलमध्ये न्यायचा अन्... (फोटो सौजन्य: iStock)
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगर अत्याचाराची घटना समोर आली. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले, पण त्यानंतरच तीच ओळख एका महिला डॉक्टरसाठी महागात पडल्याचे समोर आले.
सी. अमरनाथ (वय २७, रा. नालगोंडा, तेलंगणा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. अमरनाथविरोधात वेदांत नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तक्रारीनुसार, महिला डॉक्टरची आरोपी अमरनाथसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. काही दिवसांतच दोघांमध्ये संपर्क वाढला. त्यातून मैत्रीचे नाते घट्ट होत असताना आरोपीने तिचा गैरफायदा घेतला. शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावून त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचे फोटो-व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.
दरम्यान, मैत्रीच्या नावाखाली आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून त्याचे फोटो व व्हिडिओ काढले आणि ते तुझ्या पतीला पाठवतो, अशी धमकी देत आर्थिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.
विविध हॉटेलमध्ये बोलवायचा अन्…
अमरनाथने वेळोवेळी विविध हॉटेलमध्ये बोलावून सातत्याने अत्याचार केले, फोटो व व्हिडिओ पतीला पाठवतो, अशा धमक्यांद्वारे आरोपीने तिचा छळ केला. एवढेच नव्हे, तर तिच्या पतीपासून वेगळं करीन, अशीही धमकी दिली. या दरम्यान त्याने फोनचे आणि गुगल पेच्या माध्यमातून सुमारे ३ लाख ९८ हजार रुपये घेतले.
नंतर सांगितला पतीला प्रकार…
आरोपीची हिंमत इतकी वाढली की, तो थेट डॉक्टरच्या घरापर्यंत पोहोचला. अखेर त्रस्त झालेल्या महिला डॉक्टरने घडलेली सर्व घटना पतीला सांगितली. दोघांनी मिळून वेदांत नगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तेलंगणातील नालगोंडा येथे जाऊन आरोपी अमरनाथला अटक केली.
हेदेखील वाचा : वारजेत खळबळ ! अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; दोघांनी…






