निकालाआधी '१५ कोटी'वरून दिल्लीत हाय व्होल्टेज ड्रामा; पक्ष फोडण्यावरून आपचे संजय सिंह माध्यमांसमोर कडाडले
दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर एक्झिट पोलचे धक्कादायक आकडे समोर आले. भाजपला बहुमत मिळत असल्याचा अंदाज या एक्झिट पोलमधून मांडण्यात आला. गेली १० वर्ष सत्तेत राहिलेल्या आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षाला जेरीस आणलेल्या आपला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जर भाजपला बहुमत मिळत असेल तर आपल्या उमेदवारांना १५ कोटींची ऑफर का दिली जात आहे, असा आरोप केला होता. त्यानंतर दिल्लीच्या राजकारणात निकालाआधी मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून संजय सिंह यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
भाजप जगातीत सर्वात भ्रष्ट पक्ष आहे. पक्ष फोडणे, सरकारं पाडणे, भ्रष्ट नेत्यांना स्वत:च्या पक्षात आश्रय देणे हे आता नित्याचंच बनलं आहे. महाराष्ट्र सरकार पाडलं, कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहारचं सरकार पाडलं. आमदारांना खरेदी करणारा आणि तोडफोड करणारा हा पक्ष आहे. एलजी एसीबीला पत्र लिहितायेत आणि त्यानंतर एसीबी अरविंद केजरीवाल यांच्या घरी जात आहे. मी स्वत: आरोप करत आहे की ज्या व्यक्तीने फोन केला होता, तो कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संजय सिंह यांनी केली आहे.
#WATCH | Delhi: AAP MP Sanjay Singh says, “BJP is the most corrupt party in the country. BJP always believes in breaking other parties…BJP toppled governments in Maharashtra, Karnataka, Madhya Pradesh, Uttarakhand, Arunachal Pradesh. Do we need a certificate from them that they… pic.twitter.com/CVrpfWPrBU
— ANI (@ANI) February 7, 2025
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या आमदारांना भाजपकडून ऑफर दिली जात असल्याचा दावा केला होता. आतापर्यंत त्यांच्या १६ उमेदवारांना भाजपकडून फोन आले असून, मंत्रीपद आणि 15-15 कोटी रुपयांचं प्रलोभन दिले जात आहे. उमेदवारांना “आप” सोडून भाजपमध्ये येण्याचा दबाव टाकला जात आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
केजरीवाल यांच्या दाव्यानंतर भाजपनेही अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात थेट दिल्लीच्या उपराज्यपालांकडे तक्रार दाखल केली. तसेच केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांची एसीबी चौकशीही करण्याची मागणीही करण्यात आली आहे. भाजपच्या तक्रारीनंतर उपराज्यपाल एक्टिव्ह मोडवर आले असून त्यांनी लगेचच एसीबी चौकशीचे आदेश दिले आहे. राज्यपालांच्या आदेशानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. एसीबीची पाच जणांची टीम केजरीवालांच्या घरी दाखल झाली आहे. त्यामुळे संजय सिहं यांनी माध्यमांसमोर भाजपवर जोरदार हल्ला चढवला.