'आधी महाराष्ट्र, आता दिल्लीनंतर युपी, बिहार'; पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर इव्हीएम आणि अचानक वाढलेल्या मतांची आकडेवारीवरून गेले दोन महिने विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत. उद्या ८ फ्रेब्रुवारी रोजी दिल्ली निवडणुकांचा निकाल लागणार आहे. मात्र एक्झिट पोलचे सर्वच्या सर्व कल भाजपच्या बाजूने गेले आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवा आणि कॉंग्रेसचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान दिल्ली निवडणूक निकालाआधी राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र परिषद घेत वाढलेल्या मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. संजय राऊत यांनी तर खळबळजनक दावा केला आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर अचानक मतदारांची संख्या वाढली. दिल्लीतही तोच प्रकार झाला. येत्या काळात बिहारच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर देशातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं राज्य उत्तर प्रदेशमध्येही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि दिल्लीत वापरेली हिच पद्धत त्या निवडणुकांमध्ये वापरली जाईल, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
निवडणूक आयोग मरणासन्न अवस्थेत आहे. भाजपने त्यांच्यावर ही वेळ आणली आहे. जर निवडणूक आयोग निष्पक्ष असेल तर त्याने राहुल गांधी यांनी आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्वांची उत्तर द्यावीत. आरोप नाही पण विरोधक जर काही प्रश्न उपस्थित करत असतील तर त्याला निवडणूक आयोगाला उत्तर देऊन त्यांचं समाधान करावं लागेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार नेत्या सुप्रिया सुळे आणि शिवसेना (यूबीटी) यांच्यासोबत दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहूल गांधी म्हणाले, ‘पाच वर्षात म्हणजेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक 2019 ते लोकसभा निवडणूक 2024 या काळात 32 लाख नवे मतदार मतदार यादीत जोडले गेले. तथापि फक्त पाच महिन्यात म्हणजे लोकसभा निवडणूक 2024 ते विधानसभा निवडणूक 2024 या काळात 39 लाख मतदार मतदार यादीत जोडले गेले. मग प्रश्न आहे, की महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीनंतर 39 लाख मतदार यादीत जोडले गेले आहेत. हे 39 लाख मतदार कोणते आहेत.एकट्या हिमाचल प्रदेशचे जेवढे मतदार आहेत तेवढे मतदार महाराष्ट्राच्या यादीत या पाच महिन्यात कसे जोडले गेले. असा सवाल राहूल गांधी यांनी उपस्थित केला. तसेच, केवळ पाच महिन्यात 39 लाख मतदार कसे आणि कुठून जोडले गेले याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे, अशी मागणी लोकसभेचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.