महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदावरुन शिंदे व फडणवीसांसाठी देवाकडे साकडे घाातले जात आहे. (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल लागला आहे. महायुतीने मिळवलेल्या अफाट विजयावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र अद्याप महायुतीने सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला नाही. मुख्यमंत्रिपद हे महायुतीमध्ये डोकेदुखी वाढवत आहे. पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आरएसएस व भाजप आग्रही आहेत. भाजपला राज्यात सर्वांत जास्त जागा देखील मिळाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार यावरुन राजकारण रंगले असून कार्यकर्त्यांनी देवाला साकडे घातले आहे.
महायुतीला राज्यामध्ये घवघवीत यश मिळाले आहे. मात्र मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये वाद सुरु आहे. भाजपच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या व केंद्रातील राजकारणाच्या दोन्ही ऑफर एकनाथ शिंदे यांनी नाकारल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे व त्यांच्या पक्षापुढील पेच वाढला आहे. यामध्ये कार्यकर्त्यांनी देवापुढे साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सलग तीन टर्म म्हणजेच 2014 ला 122 आमदार, 2019 ला 105 आमदार आणि 2024 मध्ये 132 आमदार असं घवघवीत यश मिळवलं आहे. मात्र 2019मध्ये झालेल्या राजकारणातील उलथापालथीमुळे जास्त जागा मिळवून देखील फडणवीस यांना विरोधामध्ये बसावं लागलं. आणि शिंदे यांच्यासोबत सत्तेमध्ये आल्यानंतर देखील फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी यंदा मुख्यमंत्री व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे तर आरएसएसचा आग्रह देखील आहे.
भाजपा पुणे शहराच्या वतीने सारसबागेतील सिद्धिविनायकाला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडे घालण्यात आले आहे. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याची ही मनापासून इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. या राज्याच्या जनतेच्या कल्याणासाठी, शेतकरी बांधव, दलित, उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही भाजपाची भावना आहे, असे मत पुण्याचे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
तर दुसरीकडे शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी देवाकडे साकडे घालत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे घातले आहे. एकनाथ शिंदे हे आत्तापर्यंतचे सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले असून अनेक योजना त्यांच्या कार्यकाळामध्ये यशस्वी ठरल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांनी ५७ आमदार आणि ४ पुरस्कृत आमदार अशा ६१ जागा जिंकल्या. कमी जागा लढवूनही त्यांचा स्ट्राईक रेट मोठा ठरला. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं जावं ही शिवसैनिकांची भावना आहे. त्यामुळे कोणत्या नेत्याच्या गळात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार? आणि कोणाला देव पावणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.