File Photo : Raj Thackeray
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून, निवडणूक रिंगणात कोणकोणते उमेदवार असणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. ते डोंबिवलीत पहिली सभा घेणार आहेत.
हेदेखील वाचा : रिंगणात लढायला वाघाचं काळीज लागतं; जरांगेंनी माघार घेतल्यानंतर लक्ष्मण हाकेंचा टोला
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी कोणालाही पाठिंबा न देता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज्यातील पहिली जाहीरसभा सोमवारी (दि.4) डोंबिवली येथे घेणार आहेत. ही जाहीरसभा कल्याण पश्चिमचे उमेदवार उल्हास भोईर, उल्हासनगरचे उमेदवार भगवान भालेराव, मुरबाडच्या उमेदवार संगीता चेंदवणकर यांच्यासाठी असणार आहे. श्री महावैष्णव मारुती मंदिर, पी & टी कॉलनी चौक, डोंबिवली (पूर्व) येथे सायंकाळी चार वाजता ही सभा होणार आहे.
ठाण्यात 78 उमेदवारी अर्ज बाद
राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असतानाच राज ठाकरे यांनी अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये 47 इच्छुकांचे 78 उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाले आहेत. 334 उमेदवारांचे 417 अर्ज वैध ठरले आहेत.
अविनाश जाधव यांच्यासाठी ठाण्यात
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपली दुसरी जाहीरसभा मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासाठी ठाण्यात घेतील. संदीप पाचंगे, कळवा मुंब्रा उमेदवार सुशांत सुर्यराव आणि मिराभाईंदर उमेदवार संदीप राणे यांच्यासाठी असून, सायंकाळी सहा वाजता ब्रम्हांड सर्कल, आझादनगर येथे होणार आहे.
अमित ठाकरेंची राजकीय वाटचाल अवघड
महाराष्ट्रातील माहीम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासाठी आता कोणताही सुरक्षित मार्ग उरलेला दिसत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि भाजप या दोन्ही पक्षांना अमित ठाकरेंना माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणे सोपे करायचे आहे, अशी चर्चा यापूर्वी होती. मात्र, आता या जागेवरून सदा सरवणकर यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाल्यानंतर अमित ठाकरे यांची राजकीय वाटचाल अवघड असल्याचे दिसत आहे.
हेदेखील वाचा : “तर माझी माघार पण…,” सदा सरवणकर उमेदवारीचा अर्ज मागे घेणार का?