संग्रहित फोटो
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान होणार आहे. अशातचं आता निवडणुकीत एका जातीच्या बळावर जिंकणे शक्य नाहीत, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या रिंगणातून माघार घेत असल्याची घोषणा सोमवारी सकाळी केली. विधानसभा निवडणुकीत आता फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारे उमेदवार पाडायचे, असे जरांगे यांनी सांगितले. मनोज जरांगे यांच्या या घोषणेनंतर ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
हाके नेमकं काय म्हणाले?
मी मी नेहमी सांगत आलो होतो, मनोज जरांगे निवडणूक लढणार नाहीत किंवा सामोरे जाणार नाहीत. ते बारामतीच्या स्क्रिप्टनुसार वागत आहेत. जत्रा भरवणं सोपं असतं, पण लढणे अवघड असते. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी बारामतीच्या सांगण्यावरुन प्रचार केला. मात्र, आता ओबीसी समाज एकटवल्याने मनोज जरांगे यांनी रणांगणातून माघार घेतली आहे. ही माघार त्यांनी बारामतीकरांच्या सांगण्यावरुन घेतली आहे. रणांगणात लढायला वाघाचं काळीज लागतं, गनिमी काव्याचा काळ गेला, असा टोलाही लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना लगावला.
पवारांच्या उमेदवाराला पाठींबा असेल, पण…
“ज्या ज्या मुख्यमंत्र्यांनी पाठींबा दिला आहे त्यांचं आता काम करणार नाही. ज्यांनी जरांगे पाठींबा दिला त्याचा कार्यक्रम ओबीसी पाडणार. ज्यांनी पत्र दिले त्यांना भेटले त्याचा कार्यक्रम करणार. ओबीसीचा समाजाचा वापर करून निवडून आले. आमचे पण काही उमेदवार आहेत. अनेक ठिकाणचे उमेदवार निवडून येणार आहेत. निवडणुकीत आमचे ओबीसी उमेदवार आहेत. 10 ते 12 मतदारसंघात आमचे उमेदवार आहेत. काही मतदारसंघात अनेक ओबीसींनी अर्ज केले आहेत. मराठवाड्यातील 7 ते 8 जिल्ह्यातील आम्ही काम करत आहोत. ओबीसी 70 जागा लढणार आहेत. काही ठिकाणी आम्ही 30 ते 35 ठिकाणी पाठिंबा देणार आहोत. शरद पवार याच्या उमेदवाराला पाठींबा असेल पण त्यांना ओबीसी बाबत भूमिका, पाठिंबा, लेखी देणार असतील तरच पाठिंबा असेल. त्यांचा ओबीसींना विरोध असेल तर आमचा त्यांना विरोध असेल,” असं हाकेंनी स्पष्ट केली आहे.
मी पळ काढणारा नाही- हाके
“अशोक चव्हाण यांच्या विरोधात सभा घेतली आहे. त्यांनी ओबीसी बाबत भूमिका घेतली आहे. जो माणूस ओबीसी आरक्षणाच्या बाजूला असेल त्यांना आमचा पाठींबा असेल. मी पळ काढणारा नाही. तीन वाजेपर्यंत वाट पाहा. ओबीसी हक्क, अधिकार यासाठी लढणार. सोशल मीडियावर जी माझ्यावर टीका होत आहेत त्यांना ओबीसी जनता उत्तर देईल. आरक्षण हे जातीवर दिलं जात नाही आरक्षण हे प्रवर्गावर दिलं जातं,” असं हाके म्हणाले.