संगमनेर वादग्रस्त विधान प्रकरणामध्ये आता जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
संगमनेर : विधानसभा निवडणुकीपूर्वी संगमनेरमध्ये वातावरण तापले आहे. प्रचारादरम्यान भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी कॉंग्रेस नेते व संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबाबत वादग्रस्त विधान केले. जयश्री थोरात यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे संगमनेरचे वातावरण तापले होते. या टीकेनंतर आता जयश्री थोरात यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे संगमनेरमध्ये जाळपोळ झाली. काही ठिकाणी गाड्यांची फोडाफोडी देखील करण्यात आली. जयश्री थोरात यांच्यावर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारावेळी आणि त्यांच्या समक्ष टीका करण्यात आली. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्या विरोधात थोरात समर्थक आक्रमक झाले. सुजय विखे पाटील यांच्या गाडीची तोडफोड करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सुजय विखे पाटील केला होता. त्यानंतर बाळासाहेब थोरातांच्या बंधुंसह निकटवर्ती कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 109 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयश्री थोरात यांच्यावर वादग्रस्त टीका झाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय़्या आंदोलन केले. रात्रभर त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून होत्या. पोलिसांकडून कारवाई करण्यासाठी दिरंगाई झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे संगमनेर तालुका पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. या प्रकरणी आचारसंहिता असताना जमाव बंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यासह 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहिता भंग करत जमावबंदी आदेशाचा उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
हे देखील वाचा : भाजपने तिकीट नाकारल्याने आमदार ढसाढसा रडले; ईमानदारीने काम केलं पण…
बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधून बाळासाहेब थोरात यांनी घडलेल्या घटनेचा आणि विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की, पूर्वीचे राजकारण तात्विक पद्धतीने चालत होते. गेल्या पाच वर्षांत राजकारणाचा स्तर घसरला आहे. सुजय विखेंच्या कार्यकर्त्याने माझ्या मुलीबद्दल जे गलिच्छ वक्तव्य केले आहे. त्याचा महाराष्ट्रातून निषेध होत आहे. मी महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहे, यामुळे तेथील जनतेने आम्ही पाहून घेऊ असा मला निरोप धाडला आहे. म्हणून माझे कार्यकर्तेच हे प्रकरण पाहत आहेत. जयश्री आणि जनता हे सांभाळायला समर्थ आहे. एकीकडे लाडकी बहीण योजना म्हणायचे आणि दुसरीकडे असले विचार ठेवायचे. त्या नेत्याच्या बोलण्यावर स्टेजवरील मंडळी टाळ्या वाजवत होती. हे किती दुर्दैवी होते. त्यांच्या मेंदूतच हा विचार आहे. अजूनही गुन्हेगाराला अटक झालेली नाही. तो कुठे लपून बसलाय ते शोधणे पोलिसांचे कर्तव्य आहे. जयश्री सोडा हे सर्व महिलांविरोधातील वक्तव्य आहे. प्रत्येकाच्या घरात मुलीबाळी आहेत. या मागचा जो मेंदू आहे यांनासुद्धा धडा शिकविण्याची वेळ आलेली आहे, अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.