जयश्री थोरात यांच्यावर वादग्रस्त विधान करणारे वसंतराव देशमुख यांना अटक (फोटो - सोशल मीडिया)
संगमनेर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकारण रंगले आहे. मात्र संगमनेरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे संगमनेर तापले आहे. सुजय विखे पाटील यांच्या युवा मेळाव्यामध्ये प्रचारावेळी वसंतराव देशमुख यांनी मुक्ताफळं उधळली. जयश्री थोरात यांच्यावरुन वादग्रस्त विधान केल्यामुळे आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भाजप नेते वसंत देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा तीव्र विरोध करत कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. शनिवारी (दि.26) वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून ते फरार होते. त्यामुळे जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता स्थानिक गुन्हे शाखेने वसंत देशमुख यांना पुण्यातून ताब्यात घेतलं आहे.
कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आरोप केला होता की “वसंत देशमुखांना लपवून ठेवलं आहे, त्यांना फरार केलं आहे”. अखेर आज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. जयश्री थोरात यांच्यावर वादग्रस्त टीका झाल्यानंतर योग्य कारवाई न केल्याने थोरात समर्थकांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय़्या आंदोलन केले. रात्रभर त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून होत्या. पोलिसांकडून कारवाई करण्यासाठी दिरंगाई झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे संगमनेर तालुका पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. या प्रकरणी आचारसंहिता असताना जमाव बंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यासह 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहिता भंग करत जमावबंदी आदेशाचा उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 109 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची दुश्मनी नाही…; संजय राऊत नेमकं म्हणाले तरी काय?
बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधून बाळासाहेब थोरात यांनी घडलेल्या घटनेचा आणि विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की, पूर्वीचे राजकारण तात्विक पद्धतीने चालत होते. गेल्या पाच वर्षांत राजकारणाचा स्तर घसरला आहे. सुजय विखेंच्या कार्यकर्त्याने माझ्या मुलीबद्दल जे गलिच्छ वक्तव्य केले आहे. त्याचा महाराष्ट्रातून निषेध होत आहे. मी महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहे, यामुळे तेथील जनतेने आम्ही पाहून घेऊ असा मला निरोप धाडला आहे. म्हणून माझे कार्यकर्तेच हे प्रकरण पाहत आहेत. जयश्री आणि जनता हे सांभाळायला समर्थ आहे. एकीकडे लाडकी बहीण योजना म्हणायचे आणि दुसरीकडे असले विचार ठेवायचे. त्या नेत्याच्या बोलण्यावर स्टेजवरील मंडळी टाळ्या वाजवत होती. हे किती दुर्दैवी होते. त्यांच्या मेंदूतच हा विचार आहे. अजूनही गुन्हेगाराला अटक झालेली नाही. तो कुठे लपून बसलाय ते शोधणे पोलिसांचे कर्तव्य आहे. जयश्री सोडा हे सर्व महिलांविरोधातील वक्तव्य आहे. प्रत्येकाच्या घरात मुलीबाळी आहेत. या मागचा जो मेंदू आहे यांनासुद्धा धडा शिकविण्याची वेळ आलेली आहे, अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.