पुण्यातील उमेदवारांमुळे नेत्यांमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. पुण्यात देखील जोरदार राजकारण सुरु असून नाराजीनाट्य पसरले आहे. पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघामधील जवळपास सर्व उमेदवार जाहीर झाले आहेत. मात्र यामुळे पक्षातील प्रमुख नेत्यांच्या इच्छांवर पाणी फिरले आहे. त्यामुळे पुण्यामध्ये महायुती व महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीचे चित्र आहे. कसब्यामध्ये विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना पुन्हा संधी दिल्याने महिला नेत्यांने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा धंगेकर विरुद्ध रासने अशी लढत होणार आहे. कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना महाविकास आघाडीकडून तर महायुतीकडून भाजपचे हेमंत रासने यांना संधी देण्यात आली आहे. पोटनिवडणूकीमध्ये ही रंगत लढत झाल्यानंतर आता पुन्हा एकदा विधानसभेला या दोन नेत्यांमध्ये लढत होणार आहे. हेमंत रासने यांना पक्षाने परत संधी दिल्याने उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी नाराजी व्यक्त केली होती. तुम्हाला हिंदूत्ववादी सरकार हवंय, पण ३० वर्षे हिंदूत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय, असे लिहित धीरज घाटे यांनी नाराजी व्यक्त केली.
हे देखील वाचा : भाजपमधील नेते करत आहेत शिंदे गटात प्रवेश; आता माजी केंद्रीय मंत्र्यांची मुलगी करणार शिवसेना प्रवेश
त्याचबरोबर रवींद्र धंगेकर यांना कसबा विधानसभा पोटनिवडणूक, लोकसभा निवडणूक आणि आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला संधी दिली आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील काही नेते नाराज आहेत. कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्या कमल व्यवहारे यांनी पक्षाला सोडण्याचे संकेत दिले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये उतरून लढत देण्याची देखील तयारी दाखवली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये कॉंग्रेसमध्ये बंड होण्याची शक्यता आहे. यामुळे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची चिंता वाढली आहे.
पर्वती मतदारसंघात बंडखोरीचं चिन्ह
महाविकास आघाडीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवार गटाकडे हा मतदारसंघ होता. अश्विनी कदम या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आहेत. त्यांनी अक्षरशः ही उमेदवारी खेचून आणली असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या विरोधात महायुतीच्या नेत्या व विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांचे आव्हान असणार आहे. माधुरी मिसाळ यांनी आमदारकीची हॅटट्रीक केली असून आता चौथ्यांदा त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र अश्विनी कदम यांना उमेदवारी दिल्यामुळे शरद पवार गटातील नेते सचिन तावरे यांची नाराजी समोर येत आहे. पर्वती मतदार संघातील शरद पवार गटातील दोनशे ते अडीशे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी योग्य उमेदवार न दिल्याने नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा राजीनामा देणार आहेत. तसेच पत्रकार परिषद घेऊन सचिन तावरे आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे पर्वती मतदारसंघामध्ये देखील महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीचे चित्र आहे.