प्रकाश आंबेडकर यांच्या युतीच्या संकेतवर शिवसेनेच्या दोन्ही गटात वाद (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये अवघ्या काही तासांमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांचा आणि नेत्यांचा जीव टांगणीला लागले आहे. उद्या (दि.23) मतमोजणी होणार असून निकाल हाती येणार आहे. अनेक संस्थांचे एक्झिट पोल समोर आले असून त्यामध्ये अटीतटीचा सामना होणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र आता यावरुन शिवसेना ठाकरे गट व शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये वादंग निर्माण झाला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सरकार स्थापनेसाठी युती करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, “जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ. आम्ही सत्ता निवडू! आम्ही सत्तेत राहायला निवडू,” असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी युतीमध्ये सामील होण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. मात्र यावर संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला.
If VBA gets the numbers, tomorrow, to support a party or an alliance to form the government in Maharashtra, we will choose to be with one who can form the government.
We will choose power! हम सत्ता में रहना चुनेंगे!
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) November 22, 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या युतीसाठी तयार असलेल्या पोस्टवर माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणाले की, “जर प्रकाश आंबेडकर यांचे ५० ते ६० आमदार निवडून आले आणि ५० ते ६० आमदारांची गरज लागली तर त्यांच्याबरोबर युतीचा विचार करू,” असा टोला संजय राऊत यांनी केला होता. लोकसभा निवडणूकीपूर्वी वंचित बहुजन आघाडी व ठाकरे गटाची युती होती. मात्र बोलणी फसल्यामुळे ही युती तुटली. आता विधानसभेनंतर संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांना खडेबोल सुनावले. मात्र या टीकेवर शिंदे गटाचे नेते व प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
संजय शिरसाट यांनी संजय राऊतांच्या या टीकेवरुन हा दलित समाजाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका चांगली आहे. सत्तेमध्ये राहून पक्षाचा विस्तार करता येतो. “संजय राऊत यांचे हे टोमणे हा त्यांचा (प्रकाश आंबेडकर) अपमान आहे. एखाद्या नेत्याचा अशाप्रकारे अपमान करणे गैर आहे. एकेकाळी त्यांचे पाय चेपायला हेच लोकं गेले होते. बाबासाहेबांच्या नातूचा अपमान हा संपूर्ण दलित समाजाचा अपमान आहे असे मी मानतो,” असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला आहे.