फोटो सौजन्य - Social Media
गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर आगामी मराठी चित्रपट ‘समर्थ’ मधील ‘बंध विमोचन राम’ या भक्तिरसपूर्ण गीताचे समर्थ रामदास स्वामींची कर्मभूमी आणि समाधिस्थान असलेल्या सज्जनगडावर अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, या गीताचे चित्रीकरणही याच पवित्र स्थळी करण्यात आल्याने हा सोहळा अधिक भावपूर्ण ठरला. समर्थांच्या स्मृतींनी भारावलेल्या वातावरणात चित्रपटाच्या संपूर्ण टीमने उपस्थित राहून समर्थ विचारांना अभिवादन केले.
संत वेण्णास्वामी यांनी रचलेल्या या भक्तिगीताला ज्येष्ठ संगीतकार केदार पंडित यांनी संगीत दिले असून, गायिका आर्या आंबेकर यांच्या स्वरांनी गीताला भक्तिरसाची उंची प्राप्त झाली आहे. सज्जनगड संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी यांनी गीताचे सादरीकरण, संगीत आणि गायनाचे कौतुक करत चित्रपटालाही शुभेच्छा दिल्या.
दिग्दर्शक योगेश फुलफगर यांनी ‘समर्थ’ हा चित्रपट समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आजच्या पिढीशी संवाद घडवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तर निर्माता रविंद्र पाठक यांनी ‘बंध विमोचन राम’ हे गीत भक्ती, समर्पण आणि आत्ममुक्तीचा संदेश देणारे असून त्याचे अनावरण सज्जनगडावरच व्हावे, अशी इच्छा असल्याचे नमूद केले. क्रिएटिव्ह प्रोड्यूसर अमोल भगत यांनीही हा सोहळा संपूर्ण टीमसाठी अविस्मरणीय असल्याचे सांगितले.
थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश फुलफगर यांनी केले आहे. चित्रपटात भूषण प्रधान, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनिस, हार्दिक जोशी, ईशा केसकर, प्रसाद खांडेकर, राजन भिसे, यतिन कार्येकर, दिशा परदेशी आणि निखिल राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आधुनिक काळाशी जोडणारा हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.






