( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Spider Man Movie Review: मार्व्हल स्टुडिओजच्या बहुचर्चित ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ या चित्रपटाची चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून, हा चित्रपट आज जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी या चित्रपटाला टॉम हॉलंडच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्पायडर-मॅन चित्रपटांपैकी एक म्हटले आहे.
चित्रपट पाहिल्यानंतर एका चाहत्याने सोशल मीडियावर लिहिले, “‘स्पायडर-मॅन २’ नंतरचा हा सर्वोत्तम स्पायडर-मॅन चित्रपट आहे.” तर दुसऱ्या एका प्रेक्षकाने, “हा माझा आवडता स्पायडर-मॅन चित्रपट आहे. कथा, अभिनय आणि दृश्यात्मकता अप्रतिम आहे. संपूर्ण चित्रपटभर मी हसत होतो आणि अनेक प्रसंगांत डोळ्यात अश्रूही आले,” अशी प्रतिक्रिया दिली. (Spider Man Movie Review)
आणखी एका चाहत्याने चित्रपटाचे कौतुक करत लिहिले, “या चित्रपटातील प्रत्येक क्षण मला आवडला. पात्रांची मांडणी, भावनिक प्रसंग आणि क्लायमॅक्स अतिशय प्रभावी आहे. हा आतापर्यंतचा सर्वात वेगळा आणि उत्कृष्ट स्पायडर-मॅन चित्रपट आहे.”
काही प्रेक्षकांनी ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ हा चित्रपट चाहत्यांसाठी एक खास श्रद्धांजली असल्याचे म्हटले आहे. एका युझरने लिहिले, “हा चित्रपट पाहताना जणू अनेक वर्षांपासून मनात जपलेलं स्पायडर-मॅनचं स्वप्न पडद्यावर साकार झाल्यासारखं वाटलं.”
मात्र, काही प्रेक्षकांनी चित्रपटाच्या टाईमबाबत मिश्र प्रतिक्रिया दिल्या. एका चाहत्याने लिहिले, “चित्रपट परिपूर्ण नाही आणि थोडा लांबलचक वाटतो. पण कथा ज्या पद्धतीने एकत्र येते, दृश्यात्मक मांडणी आणि भावनिक प्रसंग प्रभावी आहेत. हा मार्व्हलच्या सर्वाधिक भावनिक स्पायडर-मॅन चित्रपटांपैकी एक आहे.”
दरम्यान, सोशल मीडियावर टॉम हॉलंड आणि झेंडाया यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत असून, चित्रपटातील अॅक्शन सीक्वेन्स, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि भावनिक कथा प्रेक्षकांना विशेष भावल्याचे दिसून येत आहे.






