( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Dia Mirza: बॉलिवूडमध्ये सौंदर्याच्या ठरावीक निकषांमुळे अभिनेत्रींवर अनेकदा दबाव टाकला जातो. आता अभिनेत्री दिया मिर्झा हिनेही अशाच अनुभवाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्या नैसर्गिक रूपात बदल करण्यासाठी तिला वारंवार सल्ले देण्यात आले. विशेष म्हणजे हे सल्ले महिलांनी नव्हे, तर पुरुषांनी दिल्याचे तिने स्पष्ट केले.
‘शी द पीपल’ला दिलेल्या मुलाखतीत दियाने सौंदर्याचे निकष, वाढते वय आणि कॉस्मेटिक सर्जरीबाबत स्पष्टपणे मत व्यक्त केले. ती म्हणाली की, आज अनेक महिलांना कॉस्मेटिक प्रक्रियांकडे वळण्यास प्रवृत्त केले जाते आणि या उद्योगामागे प्रामुख्याने पुरुषांची मानसिकता कार्यरत असते.
दिया म्हणाली, “महिलांना त्यांच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांबद्दल असुरक्षित वाटावे, यासाठी एक प्रकारचे वातावरण तयार केले जाते. महिलांनी आपली नैसर्गिक वैशिष्ट्ये नाकारून ती अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न केला, किंवा कॉस्मेटिक सर्जरीने आपले रूप सुधारता येईल असे मानले, किंवा आपण चांगल्या दिसत नाही असे त्यांना वाटले, तर हा एक असा सापळा आहे ज्यात महिला अडकतात. यामुळे महिला स्वतःला त्या जशा आहेत तसे पाहू शकत नाहीत.”
यावेळी तिने स्वतःच्या अनुभवाचाही उल्लेख केला. ” मी माझ्या शरीरासाठी काय करावे किंवा कोणते बदल करावेत, हेही मला सांगितले गेले आहे. माझे रूप सुधारण्यासाठी मी काय करावे, हे सर्व एक पुरुष सांगतो. माझे ओठ पातळ आहेत, मी इंजेक्शन घ्यावे किंवा माझे स्तन लहान आहेत, म्हणून मी ते मोठे करून घ्यावेत, असे सांगायला कोणतीही स्त्री माझ्याकडे आलेली नाही. या गोष्टी नेहमी पुरुषांनीच सांगितल्या आहेत आणि ते खरे आहे.”असे तिने सांगितले.
याचा तिच्यावर काय परिणाम झाला, याविषयी बोलताना दिया म्हणाली, “दोन सौंदर्यस्पर्धा जिंकल्यानंतरही मला अशा गोष्टी ऐकाव्या लागल्या. त्यावेळी मी २० वर्षांचीही नव्हते. दिग्दर्शक, निर्माता किंवा स्वतःला तज्ज्ञ म्हणवणाऱ्या व्यक्तींकडून असे सल्ले वारंवार मिळायचे. मात्र एखाद्या महिलेने मला कधीही असे काही सांगितल्याचे आठवत नाही.”‘






