( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
भारतातील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस‘ नव्या पर्वासह इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. जिओस्टारने पहिल्यांदाच हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि बंगाली अशा सहा भाषांमध्ये ‘बिग बॉस’चे नवे सीझन्स एकाचवेळी प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची घोषणा केली आहे. सप्टेंबर २०२६ पासून हे सर्व सीझन्स जिओस्टारच्या टेलिव्हिजन नेटवर्क आणि जिओहॉटस्टारवर प्रसारित होणार आहेत.
या नव्या पर्वातही हिंदीमध्ये सलमान खान, तमिळमध्ये विजय सेतुपती, तेलुगूमध्ये नागार्जुन, कन्नडमध्ये किच्चा सुदीप आणि मल्याळममध्ये मोहनलाल सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत. याशिवाय बंगाली आवृत्तीत भारताचा माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली होस्ट म्हणून सहभागी होणार असल्याने या सीझनची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधत जिओस्टारने ‘India’s Big Reality’ हे माहितीपूर्ण कॉफी टेबल बुकही प्रकाशित केले आहे. या पुस्तकात ‘बिग बॉस’चा दोन दशकांचा प्रवास, सांस्कृतिक प्रभाव, प्रेक्षकांचा सहभाग आणि ब्रँड्ससाठीचे महत्त्व यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
जिओस्टारच्या माहितीनुसार, २०२५ मध्ये ‘बिग बॉस’ फ्रँचायझीने ५० कोटींहून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत ४३८ अब्ज मिनिटांचा व्ह्यूइंग टाइम नोंदवला. सहा भाषांतील आवृत्त्यांमध्ये प्रेक्षकांच्या सहभागात ४७ टक्क्यांची वार्षिक वाढ झाली. तसेच ६२५ हून अधिक ब्रँड्सनी या शोच्या माध्यमातून आपल्या उत्पादनांचे प्रमोशन केले.
जिओहॉटस्टारवरील २४x७ लाइव्ह फीड, अब्जावधी मतदान, लाखो लाइव्ह चॅट्स आणि सोशल मीडियावरील प्रचंड चर्चेमुळे ‘बिग बॉस’ केवळ रिअॅलिटी शो न राहता एक मोठी डिजिटल आणि सांस्कृतिक घटना बनल्याचे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.
जिओस्टारचे एंटरटेनमेंट सेल्स प्रमुख महेश शेट्टी यांनी सांगितले की, “‘बिग बॉस’ने गेल्या दोन दशकांत सातत्याने स्वतःमध्ये बदल करत प्रेक्षकांचा आवाका आणि सहभाग वाढवला आहे. सहा भाषांमध्ये एकाचवेळी होणारे प्रसारण हा आमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा टप्पा आहे.”
डिजिटल एंटरटेनमेंट सेल्स प्रमुख भास्कर रमेश यांनीही ‘बिग बॉस’ हा ब्रँड्ससाठी कंटेंट, संस्कृती आणि व्यावसायिक परिणाम यांचे प्रभावी व्यासपीठ ठरल्याचे सांगितले.
प्रादेशिक भाषांमधील वाढती लोकप्रियता, प्रेक्षकांचा मोठा सहभाग आणि सोशल मीडियावरील जबरदस्त चर्चा यामुळे ‘बिग बॉस’चे आगामी सीझन्स पुन्हा एकदा मनोरंजनविश्वात मोठी चर्चा रंगवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






