फोटो सौजन्य - Social Media
3 Idiots चित्रपटातील ‘चतुर रामलिंगम’ या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता ओमी वैद्य याने पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ भावनिक आवाहन केले आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या त्यांच्या आमरण उपोषणाबद्दल चिंता व्यक्त करत ओमीने, “मला फुन्सुख वांगडूला मरताना पाहायचं नाही,” असे म्हटले आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ओमी वैद्यने स्वतःची ओळख करून देत सांगितले की, “मी ‘3 Idiots’मधला चतुर आहे. सोनम वांगचुक यांची मला प्रत्यक्ष भेट घेण्याची संधी मिळाली आहे. ते अत्यंत साधे, नम्र आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. अनेक दिवसांपासून ते उपोषण करत असून त्यांच्या रक्तातील साखरेची पातळीही कमी झाली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती पाहून मला चिंता वाटते. मला फुन्सुख वांगडूला मरताना पाहायचं नाही.” सोनम वांगचुक यांनी 29 जूनपासून दिल्लीतील जंतरमंतर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. NEET आणि CBSE प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील Cockroach Janta Party (CJP) ने हे आंदोलन सुरू केले असून वांगचुक यांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, अभिजीत दिपके यांनी उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याचा दावा केला आहे. त्यांचे स्नायू कमकुवत होत असून त्यांना तीव्र वेदनाही होत आहेत. उपोषण सोडण्याची विनंती केल्यानंतरही, “माझ्याकडे उपोषण सोडण्याची विनंती करू नका, सरकार संवाद का साधत नाही, हा प्रश्न त्यांना विचारा,” असे उत्तर वांगचुक यांनी दिल्याचे दिपके यांनी सांगितले.
सिनेप्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी! अखेर ‘खालिद का शिवाजी’ सिनेमा आला; ‘या’ OTT वर पाहता येणार चित्रपट
लडाखमधील शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील कार्यासाठी ओळखले जाणारे सोनम वांगचुक यांनी ‘आइस स्तूप’ हा अभिनव प्रकल्प विकसित केला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत 2018 मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, 3 Idiots चित्रपटातील आमिर खानने साकारलेले ‘फुन्सुख वांगडू’ हे पात्र सोनम वांगचुक यांच्या आयुष्यापासून प्रेरित असल्याचे मानले जाते.






