शूटिंगमधून वेळ काढत अभिनेत्री अश्विनी महांगडे उतरली हळदीच्या शेतात
वाई / सचिन ननावरे : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील ‘राणू आक्का’, ‘आई कुठे काय करते’ मधील ‘अनघा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील ‘माया’ या भूमिकांमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे सध्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या मालिकेत संत जनाबाई यांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बॉईज’, ‘टपाल’, ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर-एक युग’ यांसारख्या चित्रपटांमधूनही तिने आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली आहे. मात्र, पडद्यावरील या अभिनेत्रीची खरी ओळख तिच्या मातीशी असलेल्या नात्यातून पुन्हा एकदा समोर आली आहे.
वाई तालुक्यातील पसरणी हे अश्विनीचे मूळ गाव. चित्रीकरणाच्या धावपळीतून वेळ मिळताच ती गावाकडे येते आणि कुटुंबासोबत शेतीच्या कामात रमते. तिला लहानपणापासूनच शेतीची खूप आवड आहे. अनेकदा तिचे शेतीत काम करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या तिने हळदीच्या शेतात खुरपणी (तण काढणे) आणि मशागतीची कामे करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, तिच्या या साधेपणाचे आणि शेतीप्रेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अश्विनीचे वडील दिवंगत कुमार महांगडे हे वाई तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जात होते. शेतीत नवनवीन प्रयोग करून त्यांनी अनेक शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला. त्यांच्या निधनानंतर शेतीची जबाबदारी मुलगा बद्रीनाथ महांगडे यांनी समर्थपणे सांभाळली असून, अश्विनीही वेळ मिळेल तेव्हा भावासोबत शेतीच्या कामात आवर्जून सहभागी होते. महांगडे कुटुंबासाठी शेती हा केवळ व्यवसाय नसून तो संस्कारांचा आणि जगण्याचा अविभाज्य भाग आहे.
सध्या पावसाने काहीशी उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पिकांच्या मशागतीला वेग आला आहे. हळद हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात शेतात मोठ्या प्रमाणावर तण वाढते. हे तण वेळेत काढले नाही तर जमिनीतील अन्नद्रव्ये, पाणी आणि ओलावा तणाकडे वळतो व हळदीच्या कंदांच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे खुरपणी, तणनियंत्रण, माती चढविणे (भर देणे) आणि नियमित मशागत ही कामे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. या मशागतीमुळे जमिनीत हवा खेळती राहते, ओलावा टिकून राहतो, कंदांची वाढ जोमदार होते आणि उत्पादनाच्या गुणवत्तेसह उत्पन्नातही वाढ होते. म्हणूनच हळद लागवडीत वेळेवर केलेली मशागत ही यशस्वी उत्पादनाची गुरुकिल्ली मानली जाते.
याच काळात अश्विनी महांगडे हातात खुरपं घेऊन हळदीच्या शेतात तण काढताना दिसत आहे. ही छायाचित्रे केवळ फोटोसेशन नसून शेतकऱ्यांच्या श्रमांबद्दलचा आदर आणि मातीतल्या संस्कारांचे प्रतिबिंब असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. अश्विनीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना लिहिलेले शब्दही अनेकांच्या मनाला भिडले.
शासनाने बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी
पाऊस थांबला असल्याने शेतकऱ्यांची पेरणीची आणि बेनणीची लगबग सुरू आहे. हळद हे आमच्या वडिलांचे आवडतं पीक. त्यामुळे आम्ही दरवर्षी हळदीचे पिकं आवर्जून घेतो. आमचाही हळदीवर खूप जास्त जीव आहे. प्रत्येक शेतकरी प्रेमाने शेती करत असतात, पाऊस कमी जास्त प्रमाणात येत जात असतो.
– अश्विनी महांगडे, अभिनेत्री






