Sonam Wangchuk (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सलग अनेक दिवस अन्नत्याग केल्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने प्रशासनाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही त्यांनी आपला निर्धार कायम ठेवला असून आंदोलनमागे घेण्यास नकार दिला आहे.
माहितीनुसार, सलग 21 दिवस उपोषण केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यानंतर शनिवारी सकाळी पोलिसांनी त्यांना जंतर-मंतरवरून थेट सफदरजंग रुग्णालयात नेले. सध्या डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
डॉक्टरांनी वांगचुक (Sonam Wangchuk) यांना उपोषण थांबवण्याचा सल्ला दिला आहे. दीर्घकाळ अन्न न घेतल्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, आंदोलनाची भूमिका बदलण्यास ते तयार नसल्याचे समोर आले आहे.
रुग्णालयातूनही वांगचुक यांनी आपल्या समर्थकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश दिला. त्यांनी 20 जुलैचा उल्लेख करत या दिवसाला मोठे महत्त्व असल्याचे सांगितले. देशात अन्याय आणि भीतीविरुद्ध जनतेने एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले.
Sonam Wangchuk: उपोषणामुळे चर्चेत असलेले सोनम वांगचुक पैसे कसे …
20 जुलै रोजी संसदेकडे मोर्चा काढण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले आहे. त्यांच्या मते, लोकशाहीत नागरिकांनी शांततेच्या मार्गाने आपला आवाज बुलंद करणे आवश्यक आहे.
Message from Sonam : 20th JULY आज़ादी का दूसरा आन्दोलन
भय मुक्त भारत, अन्याय मुक्त भारत Freedom from injustice (Like paper leaks)
Freedom from Fear (my illegal detention) India’s 2nd FREEDOM MOVEMENT
March to the Parliament
Please make it a big success Sent through… pic.twitter.com/XYeUXgUxJH — Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 19, 2026
दरम्यान, सफदरजंग रुग्णालयाकडून त्यांच्या आरोग्याबाबत माहिती देण्यात आली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सध्या त्यांची जीवनावश्यक चिन्हे स्थिर आहेत. मात्र, दीर्घ उपोषणामुळे शरीरातील काही घटकांमध्ये बदल दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांना सतत वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या रक्त तपासण्या, हृदयाची स्थिती आणि इतर आवश्यक तपासण्यांवर नियमित लक्ष ठेवत आहे. कोणतीही अचानक गुंतागुंत निर्माण होऊ नये म्हणून 24 तास निरीक्षण सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हे आंदोलन सुरू होण्यामागे काही महत्त्वाच्या मागण्या असल्याचे सांगितले जात आहे. विविध शैक्षणिक आणि सार्वजनिक प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी वांगचुक यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे नेते आणि काही कलाकारांनीही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
त्यांना रुग्णालयात हलवण्याच्या निर्णयावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी हा निर्णय त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य असल्याचे म्हटले, तर काहींनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले.
Sonam Wangchuk यांच्या प्रकृतीबाबत पत्नीचा गंभीर आरोप; सफदरजंग …
सध्या वांगचुक यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवस त्यांच्या आरोग्यासोबतच आंदोलनाची दिशा काय राहणार, याकडेही सर्वांचे लक्ष असेल. मात्र, एक गोष्ट स्पष्ट आहे.रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही त्यांनी आपली भूमिका बदललेली नाही आणि आपल्या मागण्यांसाठी ते अजूनही ठाम आहेत.






