October heat मध्ये उन्हापासून कसा कराल बचाव? अशी घ्या शरीराची काळजी
असं म्हणतात की, एप्रिल आणि मे मध्ये जितकी उष्णता असते त्याहून जास्त उष्णता ऑक्टोबरमध्ये वाढते. त्यामुळे वाढत्या गरमीचा गंभीर परिणाम शरीरावर देखील होतो. त्यामुळे या दिवसात आरोग्याची काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात. ऑक्टोबर महिन्यात वातावरणातील तापमानात वाढ होते. म्हणूनच या दिवसात तब्बेत सांभाळणं महत्त्वाचं आहे. ऑक्टोबर हिटमध्ये दुपारवेळी शक्यतो घराबाहेर पडणं टाळावं असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. या दिवसात दुपारी सूर्याच्या अतिरिक्त किरणांमुळे शरीरातील पाणी घामावाटे निघून जाते. म्हणून जास्तीत जास्त पाणी शरीरात जाणं आवश्यक आहे.
नारळपाणी
शारदीय नवरात्र उद्यापासून सुरु होत असून त्यामुळे पुढील नऊ दिवस अनेकांचे उपवास सुरु होतील. म्हणूनच या दिवसात शरीराला हायड्रेटेड ठेवणं महत्त्वाचं आहे. उपवास आणि वातावरणातील वाढत जाणाऱ्या तापमानामुळे अशक्तपणा येण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच या दिवसात नारळपाणी पिणं फायदेशीर ठरतं. नारळपाण्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. तसंच अशक्तपणा आणि पित्त वाढू नये यासाठी तुम्ही दिवसातून दोनवेळा नारळपाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे.
सुती (कॉटन) कपडे वापरा
ऑक्टोबर हिटमुळे गरमीचा त्रास जास्त जाणवतो. म्हणून या दिवसात कॉटनचे कपडे वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. त्याचबरोबर ऊन्हाचे चटके बसू नयेत याकरीता बाहेर जाताना पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे कपडे वापरा. ऑक्टोबरमध्ये कडकडीत ऊन असल्याने घामामुळे त्वचारोग होण्याची शक्यता दाट असते. शक्य झाल्यास दिवसातून दोनदा थंड पाण्याने स्वच्छ अंघोळ करा. त्वचारोग होऊ नये यासाठी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात दोन ते तीन थेंब कापूर किंवा नीलगिरीचं तेल टाकू शकता. तसंच रात्री झोपताना स्वच्छ आणि मोकळे कपडे वापरा. शक्यतो या दिवसात झिन्स किंवा जाडसर कपडे वापरणं टाळावं.
सनस्क्रीन आणि गॉगल वापरा
अतिनील किरणांमुळे त्वचेवर याचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे त्वचा काळवंडणं, रुक्ष पडणं किंवा जळजळणं यांसारख्या समस्या निर्माण होतात. म्हणूनच बाहेर जाताना सनस्क्रीन वापर करणं फायदेशीर ठरतं. दुपारी कडाक्याच्या ऊन्हातून बाहेर जाताना एसपीएफ 50 असलेलं सनस्क्रीन वापरावं असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. त्याचबरोबर डोळ्यांना सूर्याची प्रखर किरणं सहन होत नाही. म्हणूनच या दिवसात गॉगल वापरा. तसंच बाहेर जाताना छत्री किंवा स्कार्फ वापरल्याने त्वचेच्या ऊन्हामुळे इजा होत नाही.
संतुलित आहार
ऑक्टोबर महिन्यातील गरमीमुळे शरीरातील उष्णता देखील वाढते. म्हणून या दिवसात शरीराला थंडावा मिळावा म्हणून योग्य आहार घेणं महत्त्वाचं आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे या दिवसात तेलकट आणि तिखट पदार्थ खाणं टाळा. दुपारीच्या जेवणात काकडी,दही,ताक, लस्सी आणि फळांचा ज्युस पिणं फायदेशीर ठरतं. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी जिऱ्याचं किंवा धन्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं. या दिवसांमध्ये अनेकांना युरीनरी इंफेक्शन होतं म्हणूनत रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही सब्जाचं पाणी प्यायल्याने किडनी संबंधित आजार दूर होतात. ऑक्टोबरमध्ये प्रचंड ऊन असल्याने दिवसभरात तीन ते चार लीटर पाणी पिणं शरीरासाठी आवश्यक आहे.
(ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)






