पूर्व भारतात हाहाकार! अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, ३० जणांचा मृत्यू, लष्कराला केलं पाचारण
पूर्वोत्तर भारतावर निसर्गाचा कोप पुन्हा एकदा ओढावला असून मणिपूर, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या आपत्तीत आतापर्यंत ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो नागरिकांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सच्या तुकड्या मदत व बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत.
आपली पृथ्वी बनतेय अग्निगोळा, २०२९ पर्यंत पृथ्वीचे सरासरी तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढणार
मणिपूरमध्ये गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. राजधानी इंफाल आणि परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून इम्फाल ईस्ट जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. तटबंध तुटल्यामुळे पाणी थेट रहिवासी भागात घुसले असून अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. सुमारे ८,००० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून ८८३ घरे पूर्णतः किंवा अंशतः नुकसानीस बळी पडली आहेत. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करून अधिकाऱ्यांशी बैठक घेतली आहे.
सिक्कीममध्येही जोरदार पावसामुळे दरड कोसळण्याचे प्रकार घडले असून काही रस्ते पूर्णतः बंद झाले आहेत. त्रिपुरामध्ये अगरतळा शहरात फक्त तीन तासांत २०० मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू सिव्हरमध्ये पडून झाला आहे. अरुणाचल प्रदेशातील ईस्ट कामेंग जिल्ह्यात दरड कोसळून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला, तर झीरो-कामले मार्गावर दोन मजूर मृत्युमुखी पडले.
आसाममध्येही परिस्थिती गंभीर आहे. राज्यातील ११ जिल्यांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे ७८,००० हून अधिक लोक बाधित झाले आहेत. गोलाघाट जिल्ह्यात एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्याशी संपर्क साधून स्थितीचा आढावा घेतला व केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
Monsoon Alert: ‘या’ राज्यांमध्ये पाऊस धुमाकूळ घालणार; IMD च्या अलर्टने चिंता वाढली
दरम्यान, कर्नाटकातही मुसळधार पावसामुळे भीषण नुकसान झाले आहे. एप्रिल ते मेदरम्यान सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून या कालावधीत राज्यात ७१ लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः वीज पडून ४८ जणांचा बळी गेला आहे. या पावसामुळे १५,३७८ हेक्टर शेतीचे आणि बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. केरल आणि तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भारतीय हवामान खात्याने पुढील तीन ते चार दिवसांत पूर्वोत्तर भारतात आणि दक्षिण भारतातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पूरग्रस्त भागांमध्ये मदत शिबिरे उभारण्यात येत असून अन्न, पाणी व आरोग्यसेवा पुरवण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.या संकटकाळात सरकार, प्रशासन आणि लष्कर एकत्रितपणे काम करत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.