बंदुी : मोबाईल गेमची (Mobile Game) आवड लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांना लागत आहे. याच मोबाईल गेममुळे एका लहान मुलाला त्याच्या काकाने बेदम मारहाण केली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील (Rajasthan Crime) बुंदी जिल्ह्यात घडली. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी काकाविरोधात गुन्हा दाखल केला.
बुंदी जिल्ह्यातील पिपराला गावात एका मुलाला मारहाण करून ठार केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एका 13 वर्षीय लहान मुलाला त्याच्या काकाकडून बेदम मारहाण करण्यात आली. याच मारहाणीत लहान मुलाचा मृत्यू झाला. हे प्रकरण मिटवण्यासाठी या काकाने खोटी कहाणी रचली आणि लहान मुलावर तातडीने अंत्यसंस्कार करण्याची योजना आखली. मात्र, मुलाच्या वडिलांना अंगावर जखमांच्या खुणा दिसल्या. त्यामुळे या घटनेनंतर मुलाच्या वडिलांनी आरोपी काकाविरुद्ध तक्रार दाखल केली.
मोबाईलचा हट्ट गेला जीवानिशी
हा लहान मुलगा काकांसोबत मोबाईलमध्ये गेम खेळण्याचा हट्ट करत होता. त्यावर त्याच्या काकाने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाला. लहानग्याच्या मृत्यूनंतर आरोपी काकाने मुलाच्या गावी नेऊन अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेहावर जखमेच्या खुणा आढळल्याने कुटुंबीयांनी घटनेची माहिती हिंदोली पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर मुलाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला.