लालू कन्या रोहिणींचा राजकारणाला रामराम !
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. त्यात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. मात्र, विरोधी महागठबंधनचा दारूण पराभव झाला. त्यात नामुष्की ओढवणाऱ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात मोठी फूट पडली आहे. लालू प्रसाद यांना किडनी देणारी त्यांची मुलगी रोहिणी यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे.
रोहिणी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मी राजकारण सोडत आहे. तसेच माझ्या कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडत आहे. संजय यादव आणि समीझ यांनी मला हे करण्यास सांगितले असून, मी सर्व दोष स्वतःवर घेत आहे.’ यापूर्वी २५ मे रोजी मोठा मुलगा तेज प्रतापला पक्ष आणि कुटुंबातून काढून असल्याचे टाकत लालूंनी जाहीर केले होते. त्यावेळीही तेज प्रताप यांनी संजय यादव यांना जबाबदार धरले होते आणि ‘जयचंदांनी आरजेडीला पोकळ केले आहे.’ असे लिहिले होते.
लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाला ७५ जागांवरून घसरून केवळ २५ जागांवर यावे लागले आहे. तेजस्वी यादव यांचा मानहानीकारक ५० हजार मतांनी पराभव झाला आहे. तर तेजस्वी यादव यांनाही विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला. राजदला रामराम करण्यापूर्वी रोहिणी यांनी सोशल मीडियावर पक्षातील सर्व सदस्यांना आणि कुटुंबाला अगदी लालू आणि राबडीदेवींसह सर्वांना अनफॉलो केले होते. रोहिणींचे जाणे ही लालू यादव यांच्या कुटुंबासाठी नकारात्मक बाब आहे.
कोण आहेत संजय यादव?
ज्यांच्यामुळे लालूंच्या कुटुंबात फूट पडली ते आणि आज रोजी राष्ट्रीय जनता दलात सर्वांत प्रभावशाली ठरलेले संजय यादव आहेत तरी कोण, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तेजस्वी आणि संजय यादव यांची भेट २०१२ च्या सुमारास दिल्लीतील एका क्रिकेट मैदानावर झाली होती व पुढे दोघांत मैत्री झाली. संजय यादव यांनी संगणक शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तसेच ते डेटा अॅनासिस्ट आणि प्लानर व कन्सल्टंटही आहेत. २०१३ मध्ये लालू यादव यांना चारा घोटाळ्यात तुरुंगात टाकल्यानंतर तेजस्वी यादव पाटण्याला आले. त्यानंतर त्यांनी मित्र संजय यादव यांना पाटण्याला बोलावले. त्यानंतर ते तेजस्वी यादव यांना राजकीय मार्गदर्शन करू लागले.
हेदेखील वाचा : IRCTC Scam: आयआरसीटीसी घोटाळा काय आहे? या प्रकरणात किती पैशांचा गैरवापर झाला? वाचा सविस्तर






