File Photo : Death
जबलपूर : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वे कर्मचाऱ्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबासह रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. जबलपूरच्या भेडाघाट पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. रेल्वेखाली आल्याने आख्खं कुटुंबच संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नरेंद्र चढार असे आत्महत्या केलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. नरेंद्र हा रेल्वेत ग्रुप डीचा कर्मचारी होता. त्याने स्वत: त्याची पत्नी 6 वर्षांची मुलगी आणि धाकट्या 3 महिन्यांच्या बाळासह आत्महत्या केली. याबाबत वडील जवाहरलाल चढार यांनी सांगितले की, माझा मुलगा आणि सूनेचे कधीही भांडण झाल्याचे ऐकले नाही. त्यांनी असे पाऊल का उचलले हे समजत नाही. नुकतेच 3 जून रोजी आरछा गावात आले. आमची बोलणी झाली, दिवसभर मुक्कामही केला होता. संध्याकाळी जबलपूरला परतलो.
दरम्यान, या चौघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. घटनास्थळापासून काही अंतरावर एक दुचाकीही आढळून आली. सिहोदा गावात रेल्वे कामगार राहत असल्याचे जबलपूरच्या पोलिसांनी सांगितले.