नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने कारवाईला वेग दिला असून, बुधवारी आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह (MP Sanjay Singh) यांच्या निवासस्थानावर ईडीने छापे टाकले. सूडाच्या भावनेने काम करू नका, असे सुप्रीम कोर्टाने बजावल्यानंतर 24 तासांतच ईडीचे अधिकारी सिंह यांच्या घरी धडकले होते. संजय सिंह यांना अटक झाल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.
ईडी अधिकाऱ्यांनी सिंह यांची तब्बल 10 तास कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली. या कारवाईची माहिती मिळताच आपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे जमा झाले होते. त्यानंतर निमलष्करी दलाच्या जवानांची संख्याही वाढविण्यात आली. दरम्यान, सिंह यांना मागच्या दाराने बाहेर काढून ईडी मुख्यालयात आणण्यात आले.
संजय सिंह यांना अटक झाल्यानंतर राजधानीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय सिंह यांना काल ईडीने अटक केली होती. आज संजय सिंह यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. संजय सिंह यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी आज भाजप मुख्यालयाला घेराव घालणार असल्याचे वृत्त आहे.
पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपच्या नेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांना संघर्ष करावा लागत आहे. आप समर्थकांनी संजय सिंह यांना ईडीच्या वाहनात बसण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. ईडीच्या वाहनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तसेच घोषणाबाजीही केली.