एअर इंडियाच्या मुंबई गाठणाऱ्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड;
AI-180 Emergency landing: सॅन फ्रान्सिस्कोहून कोलकाता मार्गे मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मंगळवारी प्रवाशांना कोलकाता विमानतळावर उतरवावे लागले. विमान क्रमांक AI-180 हे विमान रात्री १२:४५ वाजता नियोजित वेळेनुसार कोलकाताच्या नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. मात्र, पुढील उड्डाणापूर्वी डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आल्यामुळे विमानाच्या उड्डाणात विलंब झाला.
विमानाच्या उड्डाणामुळे सकाळी सुमारे ५:२० वाजता पायलटने विमानातील प्रवाशांना विमानातून उतरण्याच्या सुचना दिल्या. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रवाशांना खाली उतरावे लागेल. इंजिनातील बिघाड लक्षात घेता हा निर्णय घेतला जात असल्याचे पायलटने स्पष्ट केलं. सध्या या विमानाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू असून, प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून पुढील प्रवासासाठी मदत केली जात असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे.
विमानतळावरच विमान पार्क करण्यात आले असून, सध्या तांत्रिक तपासणी सुरू आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये विमानाचे डावे इंजिन डांबरी पट्ट्यावर उभे असताना ग्राउंड स्टाफ त्या भागाची पाहणी करत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअऱ इंडिया एअरलाईन्सचे प्रशासन अलर्टमोडवर आले असून प्रत्येक उड्डाणावेळी सर्व सतर्कता बाळगल्या जात आहेत. त्यातही काही तांत्रिक अडचणी आढळून आल्यास उड्डाणे रद्द केली जात असल्याचेही बोलले जात आहे.
एअर इंडियाच्या विमानांमध्ये सातत्याने तांत्रिक त्रुटी आढळून येत आहेत. सोमवारीही अशीच एक घटना घडली होती. हाँगकाँगहून नवी दिल्लीकडे निघालेल्या बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर विमानात संशयास्पद तांत्रिक बिघाड आढळल्याने ते परत हाँगकाँगला वळवावे लागले. विमान २२,००० फूट उंचीवर असताना वैमानिकाने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलले आणि दुपारी १:१५ वाजता (स्थानिक वेळेनुसार) विमान सुरक्षितपणे हाँगकाँगमध्ये उतरले. या तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. एअर इंडियाच्या सलग दोन दिवसांच्या तांत्रिक समस्यांमुळे प्रवाशांमध्ये चिंता वाढली आहे.
गेल्या २४ तासांत एअर इंडियाच्या अनेक विमानांना तांत्रिक बिघाडामुळे परतीचा मार्ग
गेल्या २४ तासांमध्ये एअर इंडियाच्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक उड्डाणे रद्द किंवा परतवण्यात आली आहेत. सोमवारी, मुंबईहून अहमदाबादकडे जाणारे AI-2493 हे विमान रद्द करण्यात आले. एअरबस A321-211 (VT-PPL) प्रकाराच्या या विमानात टेकऑफच्या वेळी समस्या जाणवत असल्याने उड्डाणात वारंवार विलंब होत होता. अखेर सुरक्षेच्या दृष्टीने उड्डाणच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याच दिवशी, दिल्लीहून झारखंडच्या रांचीकडे निघालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते उड्डाणादरम्यानच परत दिल्लीला वळवावे लागले. हे विमान सायंकाळी ६:२० वाजता रांचीतील बिरसा मुंडा विमानतळावर पोहोचण्याची अपेक्षा होती. मात्र, मार्गातच तांत्रिक अडचणी आल्यामुळे वैमानिकाने खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीकडे परतीचे उड्डाण घेतले. त्यानंतर विमानाने दिल्ली विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. या सलग घटनांमुळे एअर इंडियाच्या तांत्रिक व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित होत असून, प्रवाशांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. तांत्रिक बिघाडांबाबत चौकशी व दुरुस्तीच्या प्रक्रियेवर सध्या भर दिला जात आहे.