संग्रहित फोटो
तिरुअनंतपूरम : ट्रेनमध्ये चढण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला, आणि त्या वादाचा परिणाम 3 जणांच्या मृत्यूत झालाय. ऐकून कुणालाही धक्का बसेल अशी ही घटना आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला. एक्सप्रेसमध्ये चढण्यावरुन दोन प्रवाशांत वाद झाला. त्यानंतर चिडलेल्या एका प्रवाशानं दुसऱ्यावर चिडून पेट्रोल ओतलं, त्याला जाळण्याचा प्रयत्न केला. यात एक्सप्रेसच्या डब्यालाच आग लागली. यात 3 जणांचा मृत्यू झाला आणि 9 जण जखमी झालेत. मृतांमध्ये एक महिला, एक लहानगी आणि एका पुरुषाचा समावेश आहे. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात हा प्रकार घडला. या दुर्घटनेत 3 जणांच्या मृत्यूनंतर, त्यांचे मृतदेह रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या रेल्वे रुळांवर पोलिसांना सापडलेत.
जळीतकाडांतील आरोपी फरार
हे भयंकर कृत्य केल्यानंतर हा प्रवासी फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून, या नराधमाचा शोध आता घेण्यात येतोय. मृतांची ओळख पटली आहे. मत्तन्नूरमध्ये राहणारा रहमथ, त्याची बहीण आणि तिची दोन वर्षांची चिमुरडी या दुर्घटनेत नाहक मृत्यूमुखी पडलेत. तर या रेल्वेनं प्रवास करणारी दोन कुटुंब यात जखमी झालीयेत. सगळ्या जखमींना कोझिकोडेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरुयेत.
रेल्वेरुळांवर सापडले 3 मृतदेह
अलपुझ्झा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमध्ये रविवारी रात्री 9.45 च्या सुमारास हा प्रकार घडला. ट्रेनने कोझिकोडे पार केल्यानंतर काही वेळातच दोन प्रवाशांमध्ये भांडण झालं. त्यातील एकानं दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी इतर प्रवाशांनी साखळी खेचून ट्रेन थांबवली आणि या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली.
ज्यावेळी रेल्वे पोलीस डब्यात पोहचले. त्यावेळी एक महिला आणि मुलगी बेपत्ता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या दोघांचा तपास सुरु करण्यात आला त्यावेळी इलाथूर रेल्वे स्टेशनजवळ रुळांवर तीन मृतदेह पोलिसांना सापडले. डब्यात आग लागल्याचं पाहून त्यांनी धावत्या गाडीतून उडी मारल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. किंवा ते या गोंधळात गाडीतून पडले असल्याचीही शक्यता आहे. आरोपीला पकडण्यासाठी आता आसपासच्या सीसीटीव्हींचा शोध सुरु करण्यात आलाय.