E-20 विरोधात अरविंद केजरीवाल आक्रमक; पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावर घेऊन जाणार मोर्चा
नवी दिल्ली : पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलमिश्रित पेट्रोल वापरण्यावर केंद्र सरकारकडून भर दिला जात आहे. याने गाड्यांवर परिणाम होत आहे. त्यातच आता आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल मंगळवारी दुपारी आपल्या समर्थकांसह पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार आहेत.
अरविंद केजरीवाल आणि त्यांचे समर्थक E-20 पेट्रोलचा निषेध करणाऱ्या 100 जणांसह दुपारी 12 वाजता पक्षाच्या मुख्यालयातून निघतील आणि २.३३ लाख लोकांच्या सह्या असलेले एक निवेदन पंतप्रधानांना सादर करतील. असे जरी असले तरी या मोर्चासाठी दिल्ली पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे आता पोलिसांच्या परवानगीकडे लक्ष लागले आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे ‘कॉकरोच पार्टी’ने केलेल्या आंदोलनानंतर आणि राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या निदर्शनानंतर, ‘आप’ने आता दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
‘आप’च्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी दावा केला की, देशातील जनता ई-२० मुळे नाराज आहे. लोकांच्या वाहनांचे मायलेज कमी होत आहे आणि वाहने बिघडत आहेत. त्यांनी असाही आरोप केला की सरकार कोणत्याही कारणाशिवाय हे जबरदस्तीने लादत आहे.
FIR दाखल करण्याची धमकी
केजरीवाल यांनी आरोप केला की, शनिवारी E-20 कायद्याविरोधात आयोजित टाऊन हॉलमध्ये सभागृहाच्या आत आणि बाहेर मोठी गर्दी जमली होती आणि अंदाजे ७ लाख लोक ते ऑनलाइन पाहत होते. जर कोणताही इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर किंवा पीडित व्यक्ती आवाज उठवते, तर त्यांना ट्रोल करण्याची आणि एफआयआर दाखल करण्याची धमकी दिली जाते.
पंतप्रधान-केजरीवाल भेट होणार?
केजरीवाल यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांना एक ऑनलाईन याचिका सादर करण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत, अवघ्या काही दिवसांत २३३२३८ लोकांनी याचिकेवर स्वाक्षरी केली. त्यांनी महिनाभरापूर्वी पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मंगळवारी, ते आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन ही तक्रार वैयक्तिकरित्या सादर करतील. त्यांनी आशा व्यक्त केली की, पंतप्रधान त्यांना भेटतील आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतील.
‘ई-२०’ हे मोदी-गडकरी-फडणवीसांचा मोठा स्कॅम, नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी






